Minakshi Shinde Resignation
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदेच्या शिवसनेना पक्षाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या विरोधात काम केले म्हणून एका शाखा प्रमुखाला निलंबित केल्यानंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील आपला महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी निलंबित करण्यात आलेल्या शाखा प्रामुख्याने केली होती.
मात्र, ज्यांचा नावाला या शाखा प्रमुखाचा विरोध होता त्यांच्यात आणि शिंदे यांच्यात वाद झाल्याचे कारण पुढे येत असून त्यामुळे शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप युती जाहीर झाली नसली तरी शिवसेनेमधील माजी नगरसेवक आणि इच्छुक देखील गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मात्र निवडणुकी पूर्वीच शिंदेच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ठाणे पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भोईर कुटूंबापैकी कोणाला उमेदवारी देऊ नका, या प्रभागात फक्त स्थानिक पदाधिकाऱ्यांना उमेदवार द्या, अशी मागणी शिवसेनेतील पदाधिकारी विक्रांत वायचळ यांनी वरिष्ठाकडे केली.
मात्र, पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे विश्वासात न घेता वायचळ याची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी आपल्या पदांचा राजीनामा दिला.
विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते समजले जातात. वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे या प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. ऐन पालिका निवडणुकीत नाराज मीनाक्षी शिंदे यांनी पक्षातील वाद चव्हाट्यावर आणला असल्याने पक्षाच्या वरिष्ठांची डोकेदुखी आणखीन वाढणार आहे.
एकीकडे राज्यभरात भाजपने शिंदे गटाला शह दिले असताना दुसरीकडे पदाधिकाऱ्यांची समजूत काढता काढता एकनाथ शिंदे यांच्या नाकीनऊ आले आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे राज्यभर दौरा करत असताना ठाण्यात शिंदे गटाची धुरा सांभाळणाऱ्या खासदार नरेश म्हस्के यांच्या हुकूमशाही विरोधात नाराजीनाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.