ठाणे जिल्हा  file photo
ठाणे

ठाणे : भाजपाचे आमदार पाडण्यासाठी शिंदे गटाचे इच्छुक ठाकरे यांच्या संपर्कात?

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : दिलीप शिंदे

ठाणे हे शिवसेनेचा बालेकिला म्हणून ब्रँडिंग होत असताना भाजपने ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा जागांपैकी 12 जागांवर दावे दावा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेत खदखद निर्माण झाली असून भाजपाला धडा शिकविण्याची रणनीती काही स्थानिक इच्छुकांनी आखल्याचे वृत्त आहे. त्या रणनीतीनुसार डोंबिवली, कल्याण पूर्व, ठाण्यावर दावा ठोकत शिवसेना शिंदे गटाच्या काही इच्छुकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजेल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी राज्यभर दौरे करीत इच्छुक उमेदवारांना कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार इच्छुकांनी बॅनरबाजीसह विविध उपक्रम राबविण्याचा सपाटा लावला. त्यात ठाणे जिल्हा मागे कसा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात 18 आमदारांपैकी 15 आमदार हे महायुतीचे आहेत. त्यात 8 आमदार भाजप, पाच आमदार शिवसेना शिंदे गट, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक अपक्ष आमदार आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि मनसेचा प्रत्येकी एक आमदार आहे.

ठाणे जिल्ह्यातील आमदारांची संख्या पाहता भाजपने 12 जागांवर दावा ठोकला आहे. भाजपाची वाढती ताकद पाहता महायुतीत शिवसेनेच्या वाढीला फारशी संधी नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध सुरूच असते. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी आणि मनसेचे राजू पाटील यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदार संघांमध्ये इच्छुकांनी बॅनरबाजी करीत विद्यमान आमदारांच्या कामांवर प्रश्न उपस्थित करीत त्यांना आव्हान देण्यास सुरवात केली आहे. त्यातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र फाटक ही सुटलेले नाही. त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या एका युवा नेत्याने आव्हान देत पराभूत करण्यासाठी प्रयन्त सुरु केले आहेत. डोम्बिवली मतदार संघावर दावा ठोकत त्या इच्छुकाने प्रसंगी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेच्या कल्याण पूर्व शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या पराभवासाठी शिंदे गटाच्या इच्छुकांनी काम सुरु केल्याचे बोलले जात आहे. गायकवाड हे कारागृहात असल्याने हि जागा शिवसेनेला सोडावे याकरिता दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे. फलकबाजी, बॅनरबाजी सुरु असून भावी उमेदवार म्हणून काहीनी पदाधिकार्‍यांनी ठिकाणी बॅनर झळकल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाकडून लढण्याची तयारी ठेवल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपच्या गोटात चिंतेचे आणि नाराजीचे सूर

भाजपच्या आमदारांना पराभूत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुकांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे जाण्याची तयारी ठेवल्याची चर्चा रंगल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे आणि नाराजीचे सूर उमटले आहेत. त्याबाबतची तक्रार शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्याने आगामी काळात ते इच्छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT