ठाणे : शिंदे गटाचे डोंबिवलीतील युवा नेते आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रविवारी (दि.6) ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रवेशबंदीची घोषणा केली आहे. यामुळे डोंबिवलीतील राजकारण तापले आहे. ते आपल्या समर्थक दोन नगरसेवकांसमवेत तर सात समर्थक नगरसेवकांसमवेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीत आता भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे निश्चित झाले आहे.
रवींद्र चव्हाण हे भाजपचे कोकणातील ताकदवान नेते आहेत. त्यांच्याकडे पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद आहे. त्यामुळे त्यांना कोण आव्हान देणार, हा आतापर्यंतचा प्रश्न होता, मात्र आता दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे डोंबिवलीच्या लढतीतील उमेदवार निश्चित झाले आहे.
शिवसेनेचे युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे हे शिवसेनेच्या शिंदे गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात रंगल्या होत्या. दीपेश म्हात्रे यांनी रविवारी त्यांच्या समर्थकांसह मातोश्री येथे उद्धव सेनेत प्रवेश केल्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान दीपेश म्हात्रे यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील माजी नगरसेवकांसह आणि पदाधिकार्यांसह शिवसेना ठाकरे गटात दुपारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे आणि त्यांच्या समवेत नगरसेवकांनी केलेला प्रवेश हा ठाकरेंसाठी दिलासादायक ठरणार आहे.
शिवसेनेतील या पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे शिंदेंसोबत गेले होते. युवा सेना सचिवपदी ते शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे येऊ न त्यांनी मशाल हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दीपेश म्हात्रे यांनी मशाल हाती घेतली. यावेळी दीपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रूपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्ती शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
दीपेश म्हात्रे पक्षाचे एक वजनदार नेते होते. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. परंतु कुणीही जाण्याने कुणाचेही नुकसान होत नाही. व्यक्तीमुळे एखादा पक्ष नसतो, तर पक्षामुळे व्यक्तीचे अस्तित्व असते. एखादी व्यक्ती निघून गेल्यावर दुसरी व्यक्ती त्याची जागा घेते. शिवसेना ही संघटनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असून आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते त्याचे पाईक आहोत. परिणामी एक व्यक्ती गेल्याने पक्षाचे काहीही नुकसान होत नाही.कल्याण (पश्चिम) आमदार विश्वनाथ भोईर
डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश म्हात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का? हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.
युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाने युवा सेनेच्या मजबुतीसाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी जितेन पाटील यांची युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जितेन पाटील यांना प्रदान केले. संयमी, शांत आणि सुस्वभावी असलेल्या जितेन पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. जिल्ह्यात ते निश्चितच युवाशक्ती वाढवतील, असा विश्वास खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.