शहाड उड्डाणपुलाची कोंडी फुटणार असून हा पूल आता चारपदरी उड्डाणपूल होणार आहे pudhari news network
ठाणे

ठाणे : शहाड उड्डाणपूल चारपदरी होणार; लवकरच विस्तारीकरण

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर शहाड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून निविदा जाहीर करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे. त्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी बंद होऊन वेगवान होण्यास मदत होईल.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आपल्या मतदारसंघात वेगवान रस्ते वाहतुकीसाठी आग्रही आहे. त्यामुळे हजारो कोंटींचे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू आहेत. मेट्रो, रस्ते, पूल, उड्डाणपूल, रस्ते रूंदीकरण, रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण अशा अनेक प्रकल्पांमधून नागरिकांची वाहतूक गतीमान झाली आहे. कल्याण- उल्हासनगरसह-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी 30 मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील 36 मीटर आहे.

या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी स्थानिकांची होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची आग्रही मागणी केली होती. त्यासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक पूर्तता झाल्यानंतर आता एमएमआरडीएने या कामासाठी निविदा जाहीर केली आहे.

लवकरच कामाला सुरुवात

वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणार्‍या अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल 2+2 असा चार पदरी विकसित करणे गरजेचे आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत शहाड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रेल्वेउड्डाणपुलाची एकूण लांबी 1090 मीटर इतकी आहे. निविदा जाहीर झाल्याने लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे. त्याबदद्ल नागरिकांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT