डोंबिवली : एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी ज्येष्ठ कट्टर शिवसैनिक रमाकांत मुसलोणकर (वैद्य) यांचे मंगळवारी (दि.10) सकाळी वयाच्या 79 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
रमाकांत मुसलोणकर यांंच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. कोणतेही पद न घेता किंवा पदाची अपेक्षा न बाळगता त्यांनी शिवसैनिक म्हणून कार्य केले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला यश न मिळाल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी ही व्यथा घरच्यांसह शिवसैनिकांना बोलून दाखविली होती. सकाळी झोपेतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नोसिल कंपनीतून ते निवृत्त झाले होते. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीच्या शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ते राहत असलेल्या परिसरातील रहिवासी, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.