कसारा : शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.18) पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या क्रूझर जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुढे चाललेल्या एका कंटेनरला जोरदार धडकली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, चालकासह सात जण जखमी झाले आहेत. ही घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास घडली.
अब्दुल पाशा शेख (वय ६५) आणि जाहीद सिद्दिकी (वय ४०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुले, तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी दोन ते तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयातून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून भिवंडीकडे निघालेली क्रूझर जीप (एमएच १६, एवाय ७९३३) समृद्धी महामार्गावर किलोमीटर क्रमांक ६९० जवळ आली असता हा अपघात झाला. त्यावेळी एक कंटेनर (आरजे ०९, जीबी ९७८०) कमी वेगाने मुंबईच्या दिशेने जात होता. पहाटेची वेळ आणि रिमझिम पावसामुळे क्रूझर जीपचा चालक मारुती गुंजाळ याला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप थेट कंटेनरवर आदळली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील शासकीय रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहापूरच्या महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी छाया कांबळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेहांचे पंचनामे करून ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. वाशिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.