नेवाळी : टोलेजंग इमारतींच्या बांधकामांमुळे येथे काम करणार्या कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेकडेच दुर्लक्ष होत असल्याने होणारे अपघात पाहता कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होताना दिसून येत आहे.
कल्याण शिळ रस्त्यावरील रिव्हर वुड परिसरातही असाच प्रकार समोर आला आहे. मागील वर्षी देखील या परिसरात इमारतीवर काम करणार्या मजुराला असुरक्षिततेमुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या परिसरात कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता फक्त कागदावरच होत असल्याने कामगारांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.
दरम्यान नुकतीच भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात काम करत असताना 11 व्या मजल्यावर काम करत असताना कामगाराचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे कामगारांची सुरक्षाच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
कल्याण ग्रामीण भागातील देसाई, खिडकाळीसह आजूबाजूच्या परिसरात गृह संकुलांची प्रकल्प वेगाने सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये काम करणार्या कामगारांना शासनाकडून योग्य सुरक्षेच्या उपायोजना करून द्याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांकडे संबंधित ठेकेदार आणि उद्योजकांकडून दुर्लक्ष सुरू झाले आहे. ठाणे मनपाच्या देसाई परिसरातील इमारतींवर कामगारांच्या अपघातांच्या मालिका सातत्याने सुरू असतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार्या उपाययोजना मात्र दिसत नाहीत. रिव्हर वुड पार्क परिसरातील भल्या मोठ्या टोलेजंग इमारतीवर कामगार काम करत असताना लटकलेले दिसून येत आहेत.
जीव धोक्यात घालून कामगार काम करत आहेत. मात्र या प्रकाराकडे प्रशासनाकडून देखील कोणत्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत दिले जात नसल्याने दिवसाच्या हजेरीसाठी कामगार जीव धोक्यात घालून काम करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.