डोंबिवली : कल्याणमध्ये अपहृत बालकांना भीक मागण्यास भाग पाडणार्या सांगलीच्या चौकडीचे कारनामे उघड करत एसटी आगारातून पळवलेल्या दोघा बालकांची सुटका करण्यात आली आहे.
महात्मा फुले चौक पोलिसांनी सांगलीतील सराईत चौकडीचे कारनामे उघडकीस आणले आहेत. अपहृत बालकांना भीक मागायला लावण्याचा या चौकडीचा गोरखधंदा पोलिसांनी उद्ध्वस्त करून टाकला आहे.
उत्तरप्रदेशातून कल्याणमध्ये आलेल्या दाम्पत्याच्या दोघा बालकांचे कल्याणच्या एसटी बस आगारातून मे महिन्यात अपहरण करण्यात आले होते. मुलांच्या अपहरणाची तक्रार त्यांच्या आईने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील विटा, म्हैसाळ भागातील एका सराईत चौकडीला अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील आहेत.
विनोद रामप्पा गोसावी (36, रा. म्हैसाळ, मिरज, सांगली), आकाश विजेश गोसावी (28, म्हैसाळ), अंजली विजेश गोसावी (25) आणि चंदा विजेश गोसावी (55) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावायचे आणि त्या माध्यमातून उपजीविका करायची, असा या चौकडीचा धंदा आहे. अटक करण्यात आलेल्या चौकडीच्या विरोधात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील विटा, कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्यात एकूण 11 गुन्ह्यांची मालिका आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे राहणार्या शर्मिला मिश्रा या त्यांच्या चार मुलांसह उत्तरप्रदेशातील आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. तेथून त्या मे महिन्यात परतल्या. कल्याण रेल्वे स्थानकात उतरून समोरच असलेल्या बस आगारात अंबरनाथ येथे जाणार्या बसची त्या वाट पाहत बसल्या होत्या.
सोबत त्यांची चार लहान मुले होती. बस आगारात मुले खेळत असताना अचानक गायब झाली. रेल्वे स्थानक, बस आगार परिसरात शोध घेऊनही मुले आढळून आली नाहीत. शर्मिला यांनी तत्काळ महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुले हरवल्याची तक्रार केली.
अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, एमएफसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दखल घेऊन या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी सपोनि विनोद पाटील, पोउनि किरण भिसे, संदीप साळुंखे, सुधीर कदम, दिलीप किरपण, जुम्मा तडवी, सुमित मधाळे, श्रीधर वडगावे, महेश कोळी, हरीभाऊ दळवे यांच्यावर सोपवली. या पथकाने प्रकरणाचा चौकस तपास सुरू केला. कल्याणच्या एसटी आगार भागातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेले चार जण दोन मुलांना घेऊन वेगवेगळ्या वाहनांनी अंबाडी नाका भागात जात असल्याचे दिसून आले.
कासा आणि कल्याणच्या पोलिसांनी पुलाखाली बसलेल्या चौकडीला घेरले. कल्याण एसटी आगारातून याच टोळीने दोघा बालकांचे अपहरण केल्याचा संशय बळावला. पोलिसांनी त्या दोन्ही बालकांसह चार जणांना ताब्यात घेतले. कल्याणला आणून कसून चौकशी केली असता या चौकडीने एसटी आगारातून दोन मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक वेळ न दवडता या दोन्ही बालकांना त्यांच्या मातेच्या सुपूर्द केले. मुले सुखरूप ताब्यात मिळाल्यानंतर त्या मातेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पोलिसांनी या चौकडीची सांगली जिल्ह्यातील मूळ ठिकाणी चौकशी सुरू केली होती. चौकशी दरम्यान या चौकडीचे कारनामे कळताच पोलीसही अवाक् झाले. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या चौकडीला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या विटा, कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्यात एकूण 11 गुन्ह्यांच्या मालिकांची नोंद आहे. या चौकडीने अपहरणाचे आणखी काही प्रकार केले आहेत का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.