भारतीय मच्छीमार file photo
ठाणे

ठाणे : पाकिस्तान कैदेतील भारतीय मच्छीमारांची सुटका करा

शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पालघर : मासेमारी करताना चुकून पाकिस्तान सागरी सीमाहद्द ओलांडल्यामुळे पाकिस्तान सुरक्षा यंत्रणांनी कैद केलेल्या भारतीय मच्छीमारांचा शिक्षा कालावधी संपला आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानमार्फत मच्छीमारांना सोडले नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांची तत्काळ सुटका करावी अशी मागणी शांततावादी कार्यकर्ता जतिन देसाई यांनी केली आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय मच्छीमारांचे कुटुंबीय त्यांच्या जवळचे नातेवाईक तणावग्रस्त आणि चिंतेत आहेत. 53 भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या कराची येथील मालीर तुरुंगात तीन वर्षांहून अधिक काळ बंद आहेत. इतर 130 भारतीय मच्छिमार दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा अनुक्रमे 2021 आणि 2022 मध्ये संपली. त्यांच्या राष्ट्रीयत्वाचीही पुष्टी झाली आहे. कॉन्सुलर अ‍ॅक्सेस, 2008 वरील द्विपक्षीय कराराच्या कलम (त) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, दोन्ही सरकारे व्यक्तींना त्यांच्या राष्ट्रीय दर्जाची पुष्टी केल्यानंतर आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत सोडण्यास आणि त्यांना परत पाठविण्यास सहमती देतात. या 183 मच्छीमारांना खूप आधी भारतात परत पाठवायला हवे होते. मात्र पाकिस्तान जाणून-बुजून त्यांना पाठवत नसल्याचे आरोप केले जात आहेत.

पाकिस्तानमार्फत जुलै 2023 मध्ये 100 भारतीय मच्छीमारांना सोडणार होते आणि एप्रिल 2024 च्या शेवटच्या आठवड्यात 35 भारतीय मच्छीमारांना भारतात परत पाठवणार होते. मात्र शब्द देऊनही पाकिस्तानने मच्छीमारांना सोडलेले नाही. आपल्या घरच्या व्यक्तीला सोडणार असल्यामुळे पाकिस्तानात कैद असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र या मच्छीमारांची सुटका न झाल्यामुळे पुन्हा या कुटुंबीयांमध्ये नाराजी पसरली असून कुटुंबीय चिंतातूर आहेत. या मच्छीमारांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न करून मच्छीमारांची सुटका करावी अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

मच्छीमार आर्थिक मदतीपासून वंचित

पाकिस्तानात कैद असलेल्या भारतीय मच्छीमारांपैकी महाराष्ट्रातील असलेल्या मच्छीमार कुटुंबीयांची दयनीय अवस्था असून घरात कमावता कोणी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यातच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतनिधीच्या शासन निर्णयातील अटी शर्तींच्या कचाट्यात पडल्यामुळे महाराष्ट्रातील मच्छीमारांना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. पाकिस्तानात कैद असलेले महाराष्ट्रातील विशेषतः पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या घरातील आई, बहीण, भाऊ, मुले, यांना पैसे अभावी उदरनिर्वाह करणे जिकरीचे बनले आहे. मच्छीमारांच्या पत्नी, आई मोलमजुरी करून पोरा बाळांचा सांभाळ करत असून नातेवाईकांच्या मदतीवर या कुटुंबीयांची घरे चालू आहेत. त्यामुळे या मच्छीमार कुटुंबीयांची दयनीय अवस्था लक्षात घेत त्यांना लवकरात लवकर पाकिस्तानातून भारतात आणावे अशी एकमुखी मागणी या कुटुंबीयांचीही आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT