उल्हासनगर : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला भेटण्यास मनाई करण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयात गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी त्याच्या नातेवाईकाने वारंवार आग्रह धरला होता. मात्र, रुग्णांना भेटण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. हे समजावून सांगितल्यानंतरही संबंधित नातेवाईकाने आपला तगादा सुरूच ठेवला आणि अखेर रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली.
गोंधळ घालणार्या नातेवाईकाने रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की केली. या घटनेमुळे रुग्णालयातील इतर रुग्ण आणि कर्मचार्यांमध्ये घबराट निर्माण झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्वरित घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोंधळ घालणार्या नातेवाईकाला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, रुग्णालय प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान रुग्णालयात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.