डोंबिवली : ठाकुर्लीतील म्हात्रे सोसायटीजवळ बुधवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास विचित्र दुर्घटना घडली. ऊसाचा रस काढण्याच्या लाकडी चरख्यात काम करणाऱ्या एका तरूणाचा उजवा हात अडकला. प्रचंड वेदनांनी विव्हळणाऱ्या या तरुणाचा हात रस्त्यावरील पादचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न करून चरख्यातून कसाबसा बाहेर काढला आणि त्याला तात्काळ रूग्णालयात हलविले. या तरूणाच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली असली तरी त्याचा हात कायमचा अधू झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, तसेच नियमांचे पालन न करता ठाकुर्लीतील सार्वजनिक रस्त्यावर गजानन बबकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून लाकडी चरख्यावर ऊसाचा रस काढून त्याची विक्री करत आहेत. त्यांच्याकडे सूरज मोरे हा तरूण रस काढण्याचे काम करतो. बुधवारी (दि.19) रोजी सायंकाळच्या सुमारास सूरज हा उसाचा रस काढत असताना अचानक त्याचा उजवा हात चरख्यात घुसून मनगटपर्यंत अडकला. सूरज प्रचंड वेदनांनी विव्हळत होता. हे पाहून रस्त्यावरील पादचाऱ्यांना धाव घेऊन शर्थीने प्रयत्न करून सूरजचा हात चरख्यातून बाहेर काढला. जखमी अवस्थेत सूरजला तात्काळ रूग्णालयाला दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र तत्पूर्वी रस्त्यावरील रहिवाशांनी पादचाऱ्यांनी सूरजला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मिळेल त्या ठिकाणी बस्तान बसवून कोणतेही नियम न पाळता फेरीवाले फूटपाथसह रस्तेही बळकावून बसतात. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात सरबत, शिकंजी, बर्फाचे गोळे, ऊसाचे रसवाले, वडा-पाव, भुर्जी-पाव, चायनीजवाल्यांनी कहर केला आहे. विशेष म्हणजे उघड्यावर गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. महानगरपालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने फेरीवाल्यांचे मनोधैर्य वाढत चालले आहे. अशा बेकायदा फेरीवाल्यांसह धोकादायक ठरणाऱ्या ऊसाच्या रसाचे ठेले लावणाऱ्यांवर केडीएमसी प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे ग्राहकांच्या नजरा लागल्या आहेत.