Rashtriya Lok Adalat  file photo
ठाणे

Thane Rashtriya Lok Adalat News | अपघातातील मृतांच्या वारसास 2.85 कोटींची विमा रक्कम

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नवी मुंबईतील कामोठे पुलावर झालेल्या रस्ते अपघातात नैसर्गिक वायू महामंडळाचे (ओएनजीसी) मुख्य व्यवस्थापक धीरेंद्र रॉय यांचा अपघाती मृत्यू झाला होता. विमा कंपनी आणि पक्षकारात शनिवारी (दि.२७) रोजी ठाण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोड झाली. या समेटात रॉय यांच्या वारसदारांना सुमारे 2 कोटी 85 लाखांची रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्यात आली. (Rashtriya Lok Adalat : 2.85 crore sum assured to heirs of accident victims)

राष्ट्रीय लोक अदालतमध्येही आतापर्यंत मिळालेली ही मोठ्या रकमेची भरपाई असल्याचा दावा केला जात आहे. न्यायालयांवर असलेल्या खटल्यांचा भार कमी करण्यासाठी तसेच पक्षकारांच्या वेळ व पैशांची बचत व्हावी, यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियमित आयोजत केले जात आहे. या लोकअदालतमध्ये सर्व न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व दावे समझोता, समेट करून सोडविण्यात यश येत आहे. शनिवारी (दि.२७) रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत भरवण्यात आली होती.

या अदालती मोटार अपघात प्रकरणातील दावे देखील आपसात समझोता करून निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आले होते. नवी मुंबईतील कामोठे पुलावरून 19 जून 2022 नैसर्गिक वायू महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक धीरेंद्र ठाकूरदास रॉय, (वय 59) हे कारने कामावर जात होते. त्यांची गाडी कामोठे पुलावर येताच टेम्पो ट्रकने धडक दिली होती. या अपघातात रॉय यांचा मृत्यू झाला.

धीरेंद्र यांचावर कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या घरात आई, पत्नी, आणि दोन मुली असे कुटुंब त्यांच्या मागे आहे. रॉय यांनी 6 लाख रुपये महिन्याचा पगार होता. या सगळ्यांचा विचार करून त्यांच्या वारस पत्नीला तडजोडीसाठी बसलेल्या पॅनेलने ही भरपाई मंजूर केली. वरिष्ठ वकील एस. एम. पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावली. जिल्हा न्यायधीश 1 एस. एस. शिंदे यांच्या हस्ते मयताच्या वारसाला धनादेश देण्यात आला. यावेळी मोटार अपघात न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली शहा, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, पीडितांचे वकील एस. टी. कदम, एचडीएफसी यर्गो इन्श्युरन्स कंपनीचे वकील ए. के. तिवारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT