Thane News | ठाणे रेल्वे स्थानकात फलाट ५ - ६ साठी नवा एस्केलेटर! 
ठाणे

Thane News | ठाणे रेल्वे स्थानकात फलाट ५ - ६ साठी नवा एस्केलेटर!

मोफत शौचालय प्रवाशांच्या सेवेत दाखल, डी मार्ट करणार फलाटांची साफसफाईची कामे 

पुढारी वृत्तसेवा

ठाणे :  ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या फलाट क्रमांक ५ आणि ६ साठी सीएसएमटी दिशेकडील एफओबी क्रमांक १ येथे उभारण्यात आला आहे. हा नवीन सरकता जिना (एस्केलेटर) तसेच फलाट क्रमांक २ वरील डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेले मोफत शौचालय प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते आज या सुविधांचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी उपनगरीय लोकलसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत फलाटांवर प्रचंड कोंडी होत होती. अखेर नवीन एक्सलेटरची उभारणी रेल्वेने केली आहे. या एस्केलेटरची उभारणी करताना अस्तित्वातील जिन्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जुन्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना डेकची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांना एस्केलेटर आणि जुन्या जिन्याचा एकाच वेळी वापर करता येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डी मार्ट फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सुविधेचा विस्तार ठाणे रेल्वे स्थानकात करण्यात आला आहे. तसेच आता ठाणे रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटांची साफसफाईची कामे डी मार्टच्या माध्यमातून होणार आहे. 

नवीन शौचालय ब्लॉकमध्ये २४ तास स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता असणार असून, प्रवाशांना या सुविधेचा पूर्णपणे निःशुल्क लाभ घेता येणार आहे. शौचालयासाठी आवश्यक पाणी, वीज, ड्रेनेज आणि देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे असणार आहे.

या दोन्ही सुविधांमुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना अधिक सुलभ, स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हे लोकार्पण महत्त्वपूर्ण ठरले असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. यावेळी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांचा सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT