Bullock Cart Association Drought Relief
नेवाळी : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवलीत भेट घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. बळीराजाच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या बैलगाडा संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याने या मदतीचे बैलगाडा प्रेमींकडून कौतुक होत आहे.
यावेळी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी, प्रवक्ते राहुल पाटील यांच्यासह अन्य सहकारी देखील यावेळी उपस्थित होते. धनादेश सुपूर्द केल्यानंतर संघटनेचे प्रवक्ते राहुल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, बळीराजाच्या संघटनेच्या माध्यमातून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील पदाधिकारी, अध्यक्ष संदीप माळी आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत दुष्काळी भागातील नागरिकांसाठी आर्थिक मदत दिली आहे.
शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. गेल्या वर्षी मुरबाड परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळीही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आवश्यकतेपेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते, असे राहुल पाटील यांनी सांगितले. संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने संघटनेने मदतीचा हात पुढे केला होता. असं पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करत असलेल्या या मदतीचे बैलगाडा प्रेमींकडून देखील कौतुक केले जात आहे. बैलगाडा चालक, मालक यासह दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघटनेने आता दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिल्याने सर्वत्र या संघटनेचे कौतुक केले जात आहे.