Harshvardhan Sapkal on Pradeep Purnekar Case
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयन्त होत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला. या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष पथकांनी करायला हवा, अशी मागणी आज त्यांनी केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी शनिवारी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली. त्यानंतर पत्रकार परिषेदेमध्ये बोलताना सकपाळ यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत प्रत्यक्षात ठाणे पोलीस हे खलसंरक्षणार्थ काम करीत असल्याचा आरोप केला.
पोलिसांचा आतापर्यंतचा तपास हा कोणाला तरी वाचवण्याचा प्रयन्त करीत असल्याचे दिसते. पूर्णेकर कुटुंबियांनी पुरावे दिले, संशयितांची नावे दिली तरी कारवाई होत नाही. मुख्य संशयितांना बाजूला ठेवून भाडोत्री मारेकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कटात सहभागी असलेल्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देत असल्याचे चित्र दिसत आहे.
तपास सुरु असल्याचा भास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात तपास समाधानकारक नाही. सध्याची एसआयटी ही केवळ धूळफेक आहे. ही एसआयटी स्थानिक पोलिसांची असून त्यांवर पूर्णेकर कुटुंबियांचा विश्वास नाही. काँग्रेस पक्ष हा पूर्णेकर कुटुंबियांच्या सोबत असल्याचे सकपाळ यांनी सांगितले. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी पदाधिकारी सोबत होते.