ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करून सत्य समोर आणावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका माहेश्वरी तरे यांनी केली आहे. दरम्यान, पूर्णेकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील पाच आगरी समाज संघटनांच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तपासाला वेग देत दोन आरोपींना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी सांगितले की, पूर्णेकर हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे विभागप्रमुख होते. त्यांच्या कार्यालयातच त्यांची हत्या झाली. हत्येनंतर संशयितांच्या नावांबाबत कुटुंबीयांनी भूमिका घेतली होती. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश करण्यासाठी कुटुंबीयांनी आग्रह धरला होता. त्यानंतर पुरवणी एफआयआरमध्ये या नावांचा समावेश करण्यात आल्याचा दावा खोपकर यांनी केला.
पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याने कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला होता, असा दावाही खोपकर यांनी केला. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर पोलिसांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. ‘या प्रकरणात राजकारण आम्ही आणत नाही; मात्र आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली तर आम्ही एकत्र येऊ,’ असेही खोपकर यांनी स्पष्ट केले.
माहेश्वरी तरे यांनीही या प्रकरणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. ‘पूर्णेकर अमली पदार्थांविरोधात बोलत होते, ही त्यांची चूक होती का? सामान्य माणसांनी जगायचे नाही का?’ असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करून सत्य समोर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदीप पूर्णेकर कोणत्या पक्षाचे होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास होण्याची गरज असल्याचे तरे यांनी सांगितले.
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील पाच आगरी समाज संघटनांच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. पूर्णेकर यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो कापूरबावडी पोलीस ठाण्यापर्यंत जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.