ठाणे

ठाणे: डोंबिवलीजवळच्या उंबार्ली गावात प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या

अविनाश सुतार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: जागा-जमिनीचे व्यवहार वजा व्यवसाय करणाऱ्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचा मृतदेह डोंबिवलीजवळच्या उंबर्ली गाव परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय सखाराम भोईर ( वय 43) असे या प्रॉपर्टी ब्रोकरचे नाव असून त्यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. भोईर यांची हत्या का व कुणी केली याचा तपास मानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँच करत आहेत.

डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या मानपाडा-उंबार्ली रोडला संजय भोईर कुटुंबासह राहतात. संजय भोईर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ब्रोकरचे काम करत होते. शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भोईर यांचा मृतदेह उंबार्ली गावाजवळ असलेल्या मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या निर्जन रस्त्यावर पडलेला आढळून आला. या घटनेची माहिती कळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संजय भोईर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला.
या संदर्भात संजय भोईर यांचा मुलगा राहूल भोईर (वय 22) याच्या जबानीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास आपले वडील संजय हे त्यांच्या एम एच 05 /सी एफ/8992 क्रमांकाच्या स्कूटरवरून कुठेतरी गेले. रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही म्हणून त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, तेव्हा पानटपरीवरून घरी येतो असे सांगितले. मात्र काही वेळाने गावातील तरूणाने फोन करून संजय भोईर हे मामाश्री ढाब्याच्या पाठीमागे उंबार्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्याचे सांगितले. त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केल्याचे आढळून आले. घटनास्थळी पोहोचलेल्या राहुल याने त्याचे चुलते विजय भोईर यांच्या मदतीने जखमी वडील संजय यांना डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पीटलमध्ये नेले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

स्कूटरवरून परतताना काढला काटा

भोईर यांची हत्या धारदार शास्त्राने केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संजय भोईर हे स्कूटरने घरी परतत होते. मामाश्री ढाब्याच्या पाठीमागच्या रस्त्यावर गाठून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात भोईर जबर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. घरच्यांनी उचलून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली ? याचा चौकस तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने तपास चक्रांना वेग दिला आहे.

जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

संजय भोईर यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीला लागून भाऊबंदांची देखिल शेतजमीन आहे. जमिनीच्या बांधावरून भोईर बंधूंमध्ये वाद आहे. अधूनमधून आपसात किरकोळ होत असत. चार-पाच दिवसांपूर्वी जमिनीतील झाड तोडण्यावरून वाद झाला होता. चार-पाच जणांनी संजय भोईर यांना धमकावले होते. या संदर्भात संजय भोईर यांचा मुलगा राहूल याने काही संशयितांची नावे त्याच्या जबानीतून उघड केली आहेत. आपल्या पित्याच्या खूनाशी थेट संबंध असल्याने या संशयितांची चौकशी करावी, अशीही मागणी राहुल भोईर याने केली आहे.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT