कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील पिसाळलेल्या न्यायबंद्याने रागाच्या भरात एका पोलिस हवालदाराला ठोसा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. Pudhari News Network
ठाणे

Thane | कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील कैदी पिसाळला; भिवंडीतील पोलिसाला बदडले

खडकपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू; न्यायालयात न्यायाधिशांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातील पिसाळलेल्या न्यायबंद्याने रागाच्या भरात एका पोलिस हवालदाराला ठोसा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तत्पूर्वी या न्यायबंद्याला खटल्यातील सुनावणीसाठी पोलिस बंदोबस्तात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सुनावणीच्या वेळी या न्यायबंद्याने न्यायदंडाधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा (२९) असे न्यायबंद्याचे नाव असून तो भिवंडी जवळच्या सोनाळे गावातील प्रकाश मढवी चाळीत राहणारा आहे. एका गुन्ह्याच्या खटल्यात सद्या तो आधारवाडी कारागृहात न्यायबंदी आहे.

पोलिस हवालदार सुनील लोटन पाटील (५७) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाचा रहिवासी असलेला न्यायबंदी सुरज सिंग याला त्याच्यासह इतर चार न्यायबंद्यांना सोमवारी दुपारी बारा वाजता कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी बंदोबस्तात पोलिस व्हॅनमधून आणण्यात आले होते. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर सुरज सिंग आणि इतर न्यायबंद्यांना न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे न्यायादंडाधिकारी यांच्या समोर हजर करण्यात आले.

सुनावणी सुरू असताना न्यायबंदी सुरज सिंग हा त्याच्या खटल्यासंदर्भात न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालू लागला. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला शांत राहण्याचे बजावले. बंदोबस्तावरील पोलिस त्याला शांत राहण्यास सांगत होते. तथापी सुरज सिंग ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. शेवटी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुरज सिंग याला न्यायदान कक्षाच्या बाहेर नेण्याची सूचना केली. पोलिसांनी सुरज सिंगला न्यायदंडाधिकारी यांच्या समोरून हटवून त्याला न्यायदान कक्षाच्या बाहेर आणले. या गोष्टीचा सुरज सिंग याला राग आला. न्यायालयात घडलेल्या प्रकारानंतर सुरज सिंग आणि इतर न्यायबंद्यांना पुन्हा आधारवाडी तुरूंगात आणण्यात आले. सुरज सिंगला त्याच्या कोठडीत हवालदार सुनील पाटील जमा करण्यास चालले होते. इतक्यात अचानक सुरज सिंगने हवालदार पाटील यांच्या कानशिलात भडकावली. काही क्षणांतच आक्रमक पावित्रा घेऊन सुरज सिंगने रागाच्या भरात हवालदार सुनील पाटील यांना छाती-पोटावर ठोसा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना इतर पोलिस कर्मचारी धाऊन आले. त्यांनी सुरज सिंगच्या तावडीतून हवालदाल पाटील यांची सुटका केली. बंदीवान सुरज सिंग याच्या कृत्याबद्दल त्याच्या विरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांखाली खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. आर. दांगट या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोंडमाऱ्यामुळेही कैदी पिसाळतात ?

आधारवाडी तुरूंगात कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता 540 इतकी असताना आजमितीला तुरूंगात जवळपास 1400 कैदी आहेत. क्षमतेपेक्षाही तिप्पट कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कैद्यांमध्ये वाद होत असतात. घुसमट होत असल्याने या कैद्यांमध्ये आपापसांत वाद होतात आणि राग तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काढला जात असल्याच्या घटना यापूर्वी बऱ्याचदा घडल्या आहेत. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या कैद्यांचा प्रश्न देखिल अनुत्तरीत आहे. असा हा तुरूंग ओव्हरलोड झाल्यामुळे नव्याने येणार्‍या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा तुरूंगात पाठवले जाते. त्याचबरोबर आधारवाडी तुरूंगाची दुरूस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही लालफितीत अडकल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT