ठाणे: प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण व्हावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने येत्या 15 जुलै पासून राज्यातील प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागातील प्रत्येक आगारात येत्या सोमवार 15 जुलै पासून प्रवासी राजा दिनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ शहापूर आगारापासून होणार असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या ठाणे विभागाचे विभाग नियंत्रक विलास राठो़ड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात एस. टी. महामंडळाची आजही प्रवासी वाहतूक मक्तेदारी आहे. सुरक्षित आणि तुलनते स्वस्त प्रवास म्हणून एस. टी. महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा आहे, पण महामंडळाला 75 वर्षे झाली तरी प्रवाशांना स्थानकांमध्ये मिळणार्या मुलभूत सुविधां अभावी प्रवाशांची कुंचबणा होते. स्थानकातील अस्वच्छता, बस गाड्यांचे वेळापत्रक यासह प्रवाशांच्या अनेक अडचणी येतात, काही स्थानकांमध्ये तक्रार बुकही असते, परंतू महामंडळाकडून प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण केले जात नाही, त्याला कारण महामंडळाची काही अंशी अनास्था तर कधी निधीची वानवा असेही असते, या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी एस. टी महामंडळाने राज्यात प्रवासी राजा दिन आयोजित करण्याचे ठरविले आहे.
दिनाच्या आयोजनाबाबत माहिती देतांना राठोड म्हणाले जिल्ह्यात 15 जुलै रोजी शहापूर आगारात या दिनाची सुरवात होणार आहे. 19 रोजी ठाणे -1 तर 26 रोजी ठाणे -2 आगारात प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार आहेत. कल्याण स्थानकात 22 जुलै तर 29 रोजी मुरबाड स्थानकात प्रवासी तक्रारी जाणून घेण्यात येतील. ऑगस्ट महिन्यात भिवंडी, वाडा आणि विठ्ठलवाडी स्थानकात या दिनाच्या निमित्ताने प्रवासी तक्रारी ऐकून घेण्यात येतील. ज्या समस्या जागेवर सोडविणे शक्य आहे, त्याबाबत तिथेच निर्णय घेतले जातील, असे राठोड यांनी सांगितले. याच कालावधीत सर्व आगारात कामगार पालक दिन पाळण्यात येणार आहे. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सोडविण्यासाठी या उपक्रमामुळे मदत होईल, प्रवाशांनी आपल्या तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.