ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम यांनी जारी केलेले हे सीसीटीव्ही फुटेज. यात आरोपींसोबत राजेंद्र शिंदे दिसत आहेत. शिवाय मोटरसायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीशी राजेंद्र शिंदे यांचे वर्णन तंतोतंत जुळल्याचा दावा करण्यात आला आहे. pudhari photo
ठाणे

Pradeep Purnekar case: सीसीटीव्ही फुटेज राजेंद्र शिदेशी मिळतेजुळते? बूटपासून ते शरीरयष्टी सगळे सेम टू सेम

सोशल मीडियावर जोरदार चर्चा; फुटेजमध्ये दिसणारे कपडे, बूट, शरीरयष्टी सगळे सेम टू सेम

पुढारी वृत्तसेवा

CCTV footage in Pradeep Purnekar case sparks buzz over resemblance to Rajendra Shinde

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्हीचे समाजमाध्यमांवर फिरणारे फुटेज सध्या चर्चेचा विषय ठरले असून यातील पाचव्या व्यक्तीचे वर्णन संशयित आरोपी राजेंद्र शिंदे यांच्याशी तंतोतंत जुळल्याची कुजबूज रंगली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी समोर आणलेल्या या व्हिडीओत मारेकऱ्यांसोबत चहा पितांना उभे असलेले राजेंद्र शिंदे आणि हत्या झाली त्यावेळी हेल्मेट घालून आलेला पाचवा आरोपी यांचे शर्ट, बूट, शरीरयष्टी सर्व जुळल्याचे दिसते. सहभागी असलेल्या मारेकऱ्यांमध्ये हेल्मेट घातलेला पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच आहे असा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी यापूर्वीच केला आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला महिना उलटला तरी पोलीस मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना अटक का करीत नाहीत असा सवाल पूर्णेकर कुटुंबीय वारंवार करीत आहेत. ठाण्याच्या माजी महापौर तथा नगरसेवक मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच हत्येच्या कटा मागील मुख्य सूत्रधार आहेत असा निव्वळ आरोप न करता पूर्णेकर कुटुंबीयांनी त्यांच्या विरोधातील अनेक पुरावे देखील समोर आणले आहेत. राजेंद्र शिंदे हे या हत्येतील आरोपींना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडीओ प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी काही दिवसांपूर्वी मीडियासमोर आणले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पूर्णेकर कुटुंबीयांनी पुन्हा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आणला होता.

या सीसीटीव्ही फुटेज मध्ये अमित सिंग उर्फ पपलु वगळता हत्येतील मुख्य आरोपी, पप्या शिंदे, पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली या चार आरोपींसोबत राजेंद्र शिंदे दिसून येत आहेत. आरोपींसोबत वावरतांना राजेंद्र शिंदे याने जे कपडे व बूट घातले होते तेच बूट व कपडे मारेकऱ्यांसोबत असलेल्या पाचव्या हेल्मेटधारी आरोपीने घातले आहेत हे सीसीटीव्ही फुटजवरून स्पष्ट दिसत आहे. मात्र पोलिसांना ते कसे दिसून येत नाहीयेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर राम सीसीटीव्ही फुटेज खरे आहे की खोटे याची पडताळणी करण्यासाठी ते तपासणीसाठी पाठवले आहे असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

हेल्मेट व कपडे पोलिसांना मिळेना पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या एसआयटीने आता पर्यंत हत्येत हत्यार, दुचाकी, अल्टो कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, हत्येवेळी आरोपींनी घातलेले कपडे व पाचव्या आरोपीचे हेल्मेट मात्र अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाही. पाचही मारेकरी अकरा दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात असूनही आरोपींनी कपडे व हेल्मेट कुठे लपवले हे पोलिसांना भल्या भल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पोपटासारखे बोलते करण्यास भाग पाडणारे ठाणे पोलीस या गुन्ह्यात मात्र आरोपी तपासात सहकार्य करीत नाहीत अशी भूमिका न्यायालयासमोर सतत मांडत होते.

राम पूर्णेकर यांनी जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे तरी काय ?

राम पूर्णेकर यांनी जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आणला आहे तो प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या काही वेळे पूर्वीचा कापूरबावडी भागातील एका हॉटेलबाहेरचा आहे. ज्यात राजेंद्र शिंदे हा पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली या चार आरोपींसोबत चहा पीत उभा आहे. त्याने ब्लु जीन्स व लाईनिंगचा शर्ट घातला आहे. तर पूर्णेकर यांच्या हत्येच्यावेळी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीत हेल्मेट घातलेल्या पाचव्या आरोपीने देखील तसेच सेम टू सेम शर्ट, जीन्स व बूट घातलेले स्पष्ट दिसून येत आहे. हत्येच्या घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रणात पप्या शिंदे व निखिल यादव हे दोघेही प्रथम एका मोटारसायकल वरून एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

पप्या शिंदेने यादवला मोटारसायकल वरून खाली उतरवले व तो एकटाच पूर्णेकर यांच्या ऑफिसच्या दिशेने गेला. त्यानंतर संतोष कनोजिया उर्फ टल्ली व नितेश पवार हे दोघेही सफेद रंगाच्या स्कुटीवरून घटनास्थळी आले. त्यांच्या मागे एक काळ्या रंगाची मोटारसायकल वरून ब्लु जीन्स, लाईनिगचा शर्ट व काळे बूट घातलेला एक जण हेल्मेट घालून येतांना दिसतोय. हा हल्मेटधारी बरोबर पूर्णेकर यांच्या ऑफिस समोर काही क्षण उभा राहून रेकी करतो व पुन्हा पुढे निघून जातो.

त्यानंतर निखिल यादव, हेल्मेटधारी पुढे निघून जाताच पूर्णेकर यांच्या ऑफिसमध्ये पाच ते सहा राउंड झाल्याचा आवाज येतो असे पुर्णेकर यांच्या ऑफिस समोरील एका मेडिकल शॉपच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. कनोजिया आणि पवार हे तिघेही पूर्णेकर यांच्या ऑफिसमधून घाईघाईने बाहेर पडून मोटारसायकल वरून पळून जात असल्याचे देखील या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसून येत आहे. तर हत्येनंतर पप्या शिंदे हा पूर्णेकर यांच्या कार्यालयातच थांबला होता. या साऱ्या फुटेज मधून हेल्मेटधारी व आरोपींसोबत चहा पीत उभा असलेला व्यक्ती याचे कपडे, बूट व शरीरयष्टी सारखीच असल्याचे दिसून येते. हेल्मेटधारी पाचवा आरोपी फक्त घडवून आणलेल्या हत्येच्या घटनेवर देखरेख करण्यासाठी आला होता असा पोलिसांना संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT