Kalyan Phata Mahape Road Potholes Pudhari
ठाणे

Kalyan Phata Traffic | खड्ड्यांनी रोखला कल्याण फाटा–महापे मार्गाचा वेग; अपघाताचा धोका वाढला

कल्याण ग्रामीणच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Phata Mahape Road Potholes

शुभम साळुंके

नेवाळी : एमआयडीसीच्या अखत्यारीतील कल्याण फाटा ते महापे हा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग सध्या खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून, त्यामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी हजारो कामगार, नोकरदार तसेच अवजड वाहनचालक तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असली, तरी कोंडीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे कठीण ठरत आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राला जोडणारा हा प्रमुख मार्ग औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी तसेच दोन्ही बाजूंना खोल खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कल्याण फाटा चौक ते महापे महामार्गाला जोडणारा हा मार्ग चढ-उताराचा असल्याने खड्ड्यांचा धोका अधिक वाढला आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक अचानक लेन बदलत असल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून त्याचा परिणाम कल्याण-शीळ मार्गावरील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. विकासाच्या घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांच्या चर्चा होत असताना, लाखो नागरिक वापरत असलेला हा मार्ग अद्याप खड्डेमुक्त न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील हा प्रमुख मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत असून, एमआयडीसी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मनसेची प्रशासन व लोकप्रतिनिधींवर टीका

मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव शरद पाटील यांनी या प्रश्नावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका केली आहे. शिळफाट्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध असतानाही २४ तास वाहतूक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात संबंधित यंत्रणा आणि वाहतूक पोलिस अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.

कल्याण रोड ते महापे रोड उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण झाला असता, तर आजची वाहतूक कोंडी टाळता आली असती, असा दावा त्यांनी केला. शिळफाटा टोलनाक्यावर आठपदरी रस्त्याच्या नावाखाली टोल आकारला जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना चारपदरी रस्त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

कल्याण-शिळफाटा रस्त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी मोबदल्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप करत, रखडलेले प्रकल्प, वाहतूक कोंडी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व खासदारांनी घोषणांऐवजी प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

अपघाताची भीती वाढली

महापेकडून कल्याण फाट्याकडे येणारी वाहने उतारावरून, तर कल्याण फाट्याकडून महापेकडे जाणारी वाहने चढावावरून प्रवास करतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे संतुलन बिघडून समोरासमोर धडक होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तरी डांबरीकरण करून खड्डे बुजवावेत, अन्यथा या मार्गावर मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT