महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुणी चर्चा करीत नसल्याने एनसीपीने स्वबळाचा नारा देत नव्या मित्र पक्षाचा शोध सुरु केला आहे. Pudhari News Network
ठाणे

Thane Politics : शिवसेना भाव देत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पर्याय; भाजपकडून कुबड्यामुक्त निवडणुका लढविण्याची रणनीती

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महायुतीतील मित्र पक्ष असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शिवसेनेकडून दुर्लक्षित केले जात असल्याची वारंवार तक्रार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते करीत असतात. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुणी चर्चा करीत नसल्याने एनसीपीने स्वबळाचा नारा देत नव्या मित्र पक्षाचा शोध सुरु केला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात शिवसेनेविरोधात आघाडी उघडत भाजपकडून कुबड्यामुक्त निवडणुका लढविण्याची रणनीती आखली जात असल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुंबई वगळता राज्यभरात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. शिवसेनेला मुंबई महापालिकेत निम्म्या जागा हव्या असल्या तरी भाजपकडून फक्त ५० ते ६० जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. या वाटाघाटीच्या बदल्यात उर्वरित महापालिकांच्या जागा वाटपाबाबत तडजोडी होतील आणि त्याची संक्रांत ठाणे जिल्हावर पडण्याच्या भीतीने भाजपचे स्थानिक नेते अस्वस्थ आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आतापर्यंत भाजप नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतलेली दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीपासून घेण्यात आलेली ही नरमाईची भूमिका आगामी निवडणुकांमध्ये तरी बदलावी अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक आमदार, नेत्यांकडून वारंवार व्यक्त केली जात आहे. त्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ही अपवाद नाही. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याने भाजपकडून पक्ष प्रवेशाचा बॉम्ब फाडले जात आहेत. त्यामध्ये ठाकरे शिवसेनेचे नेते दीपेश म्हात्रे यांचा समावेश असून त्यांच्या हाती भाजपाचे कमळ देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. एवढेच नाही तर माजी आमदार सुभाष भोईर ह्यांना देखील जुन्या घराची आठवण भाजपकडून करून दिली जात आहे. तसे झाल्यास २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे कल्याणात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होऊन विरोध पक्षांना धोबीपछाड दिला जाईल.

नवी मुंबई महापालिका आणि मीरा-भाईंदर

महापालिकेत उलटी भूमिका असून भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यांना शिवसेनेसोबत घेऊन निवडणूक लढविण्यास स्वारस्य नाही. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी थेट भूमिका घेत शिवसेनेला लक्ष केलेले आहे. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षाची स्वतःची ताकद असलेल्या महापालिकांमध्ये एकमेकांविरोधात भूमिका घेतली जात आहे. मात्र महायुतीचा तिसरा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अवस्था ही ना घर का ना घाट का अशी झालेली दिसून येते. त्या नैराश्येतून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ९० माजी नगरसेवक झालेल्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे हे ओझे वाटू लागल्याने ते दुर्लक्षित करून एनसीपीला कार्यक्रमापासून दूर ठेवत असतात.

राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या नाऱ्याकडे दुर्लक्ष

राबोडीत वगळता अन्य ठिकाणी अधिकच्या जागा सोडाव्या लागतील आणि महायुतीचे नुकसान होऊ शकते, अशी गणिते शिवसेनेकडून मांडली जात असल्याने राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या नाऱ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवसेनेची ही दुर्लक्षित करणारी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना जिव्हारी लागत असल्याने त्यांनी अन्य पर्यायांचा शोध सुरू केला आहे.

येथे भाजपला राष्ट्रवादीसोबत फायदा

भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर भाजपसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस गांभीर्याने विचार करीत आहे. कारण ठाण्याबरोबर कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूरमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो, अशीही चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT