भिवंडी मनपाच्या शाळांची दुरवस्था होत असतानाच दुसरीकडे भिवंडी पूर्वचे सपा आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नाने गैबी नगर येथील शाळा क्र 22 व 62 या उर्दू माध्यमाच्या मुलींच्या शाळेसाठी नऊ कोटी रुपयांचा शासकीय निधी उपलब्ध करून बांधण्यात आलेल्या नव्या डिजिटल मनपा शाळेच्या उद्घाटनावरून भिवंडीत राजकारण तापले आहे.
शाळेच्या उद्घाटन पत्रिकेत राजकीय हेतूने समाजवादी पार्टीचा गवगवा करण्यात आला असून त्यातून केवळ राजकारण होत असल्याचा आरोप भाजपाचे विभागीय सरचिटणीस आनंद गद्रे यांनी करीत उद्घाटन रद्द करण्याची मागणी मनपा व पोलीस प्रशासनाकडे केल्यानंतर मनपा प्रशासनाने उद्घाटनाच्या दिवशीच शुक्रवारी (दि.4) सकाळी कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना कार्यक्रमाचे आयोजक आमदार रईस शेख यांना लेखी नोटीसद्वारे केल्या होत्या.
मनपाच्या या लेखी नोटीसमुळे शाळेच्या उद्घाटनावरून शुक्रवारी (दि.4) सकाळपासूनच चांगलेच राजकारण तापले होते. त्यातच आपण मनपा प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन केले असून मनपा प्रशासनाला शाळेच्या या उद्घाटना संदर्भात संपूर्ण माहिती असून कोणत्याही परिस्थितीत शाळेचे उद्घाटन होणारच या निर्णयावर आमदार रईस शेख ठाम राहिले होते. मात्र सायंकाळी चार वाजल्या पासून कार्यक्रम रद्द होणार असल्याची माहिती समाजवादी कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी उद्घाटन स्थळी एकच गर्दी केली होती. यावेळी शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित झाले होते. तर कार्यक्रमास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गैबी नगर ते शांतीनगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिगेट लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
शाळा इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या आमदार रईस शेख यांना भिवंडी पोलिसांनी रस्त्यातच अडवल्याने आमदार रईस शेख यांनी गाडीवरूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत भाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासनाने शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला असल्याचा आरोप करत, शाळा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसह शाळेत शिकणार्या विद्यार्थिनींचा मनपा प्रशासनाने भ्रमनिरास केला असून या शाळेचे उद्घाटन शब्दसुमनांनी केल्याचे आमदार शेख यांनी जाहीर करत, आम्ही भिवंडीकरांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. हे भाजपला झोबले मात्र आम्ही सुस्त बसणारे नसून यापुढे शहरात आणखी शाळा महाविद्यालययांच्या इमारती उभ्या करू आणि भिवंडीतील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवून भिवंडीचा विकास करू अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार शेख यांनी देत उपस्थित कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत पोलिसांचे आभार मानले.