ठाणे : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेने जितेंद्र आव्हाडांना कळव्यात मोठा धक्का दिला होता.आता जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी देखील गुरुवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिलाच मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघातही मोठी खेळी खेळली असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
महापालिका निवडणुकांच्या तारखा अजून निश्चित झाल्या नसल्या तरी, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. खाडीच्या पलिकडे असलेल्या कळवा परिसरात भाजपने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयन्त केला होता. मात्र शिंदेच्या शिवसेनेने भाजपची ही खेळी यशस्वी होऊन दिली नव्हती. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मात्र उपमुख्यमंत्री शिंदेच्याच मतदारसंघात भाजपने राजकीय खेळी केली असून जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक अमित सरय्या यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला असून यानिमित्ताने भाजपने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिलाच मात्र शिंदेच्या शिवसेनेसमोरही नवे आव्हान उभे केले आहे.
ठाणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे इतर पक्षातील मोठे मासे आपल्या गळाला लावण्याचे शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे शिंदे ताकद लावत असताना भाजप पण मैदानात उतरली आहे. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघांत भाजपची ताकत वाढवण्यासाठी भाजपचे कसून प्रयन्त सुरु असून हा प्रवेश त्याची सुरुवात मनाली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
फेसबुक प्रकरणानंतर सरय्या यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता
भाजपचे दिवंगत नागरसेक विलास कांबळे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकण्यात येत होत्या. या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी व्हावी यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित सरय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतरला लगेचच हा पक्षप्रवेश झाला आहे.