भिवंडी : संजय भोईर
राज्यात भाजपा मोठा भाऊ असला तरी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे शिलेदार एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना हाच मोठा भाऊ आहे, असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले. गुरुवारी (दि.26) रोती सायंकाळी उशिरा तालुक्यातील वडपे येथील संग्रिला रिसॉर्ट येथे शिवसेना भिवंडी लोकसभा कार्यकर्ता मार्गदर्शन सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
दरम्यान शिवसनेने मोठा भाऊ असल्याचे सांगत महापालिकांच्या महापौर पदावर दावा केल्याने शिवसेना भाजप महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी आमने सामने येण्याची शक्यता आहे. कोकणची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावर देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात झालेल्या मेळाव्याला या दोन मंत्र्यांबरोबरच शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे,उपनेते रुपेश म्हात्रे, निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख देवानंद थळे, संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक, मारुती धिर्डे, अरुण पाटील, शाम पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तर मेळाव्यास भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी, शहापूर, मुरबाड व कल्याण तालुक्यातील पक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी भिवंडी वाडा रस्त्यावरील रुग्णांना वेळीच आरोग्यसेवा मिळण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका सुरू केली असून तिचे लोकार्पण भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. तर आमदार शांताराम मोरे यांच्या वतीने उपस्थित मंत्रीद्वयांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पण ठाणे जिल्ह्यात ताकद कोणाची आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे, असे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. तर भिवंडी तालुक्यातील सर्व रस्त्यांवर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत व निलेश सांबरे यांना पक्षात घेतल्याबद्दल विचारले असता राजकारण कधी कुठे वळण घेईल हे सांगत येत नाही. पण, खड्डेमय झालेल्या रस्त्यावर शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली असून रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत तातडीने निर्णय झाला आहे, असे शेवटी भरत गोगावले यांनी सांगितले.
हिंदी भाषेवरून बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत हिंदी भाषा अनिवार्य झालेली नाही. हिंदी सक्तीबाबत अभ्यास करणार्या डॉ. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. हे जनतेला कार्यकर्त्यांनी पटवून द्यावे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठी भाषेवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये फक्त शिवसेनेचा आवाज आहे. त्यामुळे येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवायचा आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता मतदार नाव नोंदणी व पक्ष सदस्य नोंदणी यावर अधिक लक्ष द्यावे. पक्ष उमेदवारी देताना अशा शिवसैनिकांनाच उमेदवारी देणार, असे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.