Thane Police Jammu Kashmir Drug Smugglers Arrested Pudhari
ठाणे

Thane Crime | ठाणे पोलिसांची मोठी कारवाई: तीन किलो चरस जप्त; जम्मू-काश्मीरमधील दोन तस्कर अटकेत

यापूर्वी 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12 हजार 984 नशेच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या

पुढारी वृत्तसेवा

Thane Police Jammu Kashmir Drug Smugglers Arrested

ठाणे : ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने चरस तस्करीविरोधात मोठी कारवाई करत कळवा परिसरातून अटक केलेल्या एका तस्कराच्या चौकशीतून जम्मू-काश्मीरमधील आणखी दोन तस्करांना जेरबंद केले आहे. या कारवाईत यापूर्वी 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12 हजार 984 नशेच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या होत्या.

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव टोलनाका परिसरात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार 8 मे 2026 रोजी सापळा रचून फिरोज अब्दुल खान (52, अंकलेश्वर, गुजरात) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 3 कोटी 2 लाख रुपये किमतीचा 3 किलो 20 ग्रॅम चरस आणि 12 हजार 984 नशेच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान फिरोज खान याने हा अमली पदार्थ जम्मू-काश्मीरमधून ठाण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने थेट काश्मीरमध्ये जाऊन तपास सुरू केला. या मोहिमेत 19 मे रोजी मोहम्मद अश्रफ गुलाम अहमद शेदा (42, समशीपुरा, जिल्हा अनंतनाग) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा साथीदार शौकत अजीज मीर उर्फ जुबेर (देवर लोलाब, जिल्हा कुपवाडा) याला 6 जून 2026 रोजी कुपवाडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर ठाण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी जम्मू-काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात चरस ठाण्यात आणून विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याच्याविरुद्ध अहमदाबाद आणि जम्मू येथे अमली पदार्थ तस्करीचे दोन गुन्हे दाखल असून त्या दोन्ही प्रकरणांत त्याला शिक्षा झाली होती. दोन वेळा शिक्षा भोगूनही त्याने पुन्हा चरस तस्करीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासातून समोर आले असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT