ठाणे : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा बांगलादेशीय आरोपी ठाण्यातील मजूर वसाहतींमधून पकडण्यात आला आहे. बांगलादेशीयांच्या वाढत्या घुसखोरी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व बिल्डरांकडे काम करणाऱ्या कामगारांची ठाणे पोलिसांनी सखोल चौकशी करून सर्व माहिती गोळा करून संबंधित कामगारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. यामुळे विकासक आणि मजूर ठेकेदार अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईतील सिनेकलाकार अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यातील हिरानंदनानी इस्टेट येथील बांधकाम मजुरांच्या कॅम्पमध्ये राहत असून त्याला खाडी किनाऱ्यावरील कांदळवनातून पकडण्यात आले. हा आरोपी मूळचा बांगलादेशीय असल्याची माहिती पुढे आली असून तो विजय दास या नावाने मजूर म्हणून राहत होता. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या पार्श्वभूमीचा प्रश्न पुढे आला आहे. ठाण्यात मोठ्याप्रमाणावर नवीन बिल्डिंग आणि मेट्रोची कामे सुरु असून हजारो संख्येने मजूर काम करीत आहेत. त्यांची माहिती संबधित मजूर ठेकेदार तसेच विकासकाने पोलिसांना देणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने खासदार नरेश म्हस्के यांनी मजुरांच्या माहिती लपवून राहण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिले आहे.
आरोपीला पकडण्यात आलेल्या ठिकाणी तसेच तो राहत असलेल्या मजूर कॅम्पात जाऊन खासदार म्हस्के यांनी चौकशी केल्यानंतर शेकडो झोपड्या बांधण्यात आल्याचे दिसून आले. या झोपड्या विकासकाच्या माध्यमातून बांधण्यात आल्या असून तिथे हजारो मजूर राहत आहे. या कामगारांची कोणतीही चौकशी न करता किंबहुना त्या कामगारांची कोणतीही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली नसल्याची माहिती मिळाली असल्याचे म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अशा प्रकारची कामे ठाण्यात अनेक ठिकाणी सुरु असून हजारो कामगार काम करीत आहेत. त्यामध्ये बांगलादेशीय कामगार ही असण्याची दाट शक्यता आहे. सर्व विकासकांनी आपल्याकडील कामगारांची सर्व माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही विकासकांकडून तशी माहिती दिली जात नाही. बांगलादेशीय नागरिक हे कामाच्या बहाण्याने काही दिवस राहतात आणि त्यानंतर ठाणे, मुंबईत गुन्हेगारी कारवाया करतात. त्याचबरोबर विकासकांनी उभारलेल्या मजूर कॅम्पमध्ये मोठ्याप्रमाणावर गुन्हेगारी जगतात वावरणारे अनेक आरोपी रहात आहेत, अशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात यापासून ठाणे शहराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने सर्व विकासकांच्या मजूर कॅम्पची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी लेखी मागणी खासदार म्हस्के यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.