Thane Police: ठाणे पोलिसांकडून निर्दोष तरुणास नग्न करून अमानुष मारहाण, पूर्णेकरांचा आरोप 
ठाणे

Thane Police: ठाणे पोलिसांकडून निर्दोष तरुणास नग्न करून अमानुष मारहाण, राम पूर्णेकरांचा आरोप

कापूरबावडी पोलिस ठाण्यातील प्रकार : अवघड जागेवर मारहाण केल्याचा राम पूर्णेकर यांचा आरोप, गुप्त अंगाला गंभीर जखमा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : उबठा शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी गुरुवारी दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबिंयांची सांत्वनपर भेट घेतली. हे नेते पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन माघारी फिरल्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी मानपाडा-कापूरबावडी परिसरात कॉम्बिग ऑपरेशन राबवून काही तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी काही तरुणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून अमानुष मारहाण केली.

तर नाका कामगार म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला दोन पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून त्याची पॅन्ट उतरवायला लावून त्याच्या गुप्त अंगाला तेल लावण्यास भाग पाडले व त्यानंतर पट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच या तरुणास किळसवाणा प्रकार करायला लावला. असा गंभीर आरोप प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी केला आहे. तर सदरच्या पीडित तरुणाने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्यास आवारातच त्यास अमानुष मारहाण झाल्याचे व्रण पत्रकारांसमोर दाखवले.

कापूरबावडी पोलिसांकडून परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आल्यानंतर काही लहान मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित मुलांना न्याय मिळावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पीडिततर्फे अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, पीडित तरुणाला मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणी मध्ये तरुणाच्या गुप्त अंगाच्या ठिकाणी गंभीर जखम झाल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

साध्या गणवेशात पोलिसांनी केली जबर मारहाण - पीडित तरुण

मी कामाच्या शोधत कापूरबावडी येथील नाक्यावर उभा असताना मोटारसायकल वरून साध्या वेशातील दोन पोलीस तेथे आले. त्यांनी एक फोटो मला दाखवला व या व्यक्तीस तू ओळखतो का असे विचारले. मी त्या फोटोतील व्यक्तीस ओळखत नसल्याने मी त्यांना ओळखत नाही असे सांगितले. त्यानंतर दोघा पोलिसांनी मला मोटारसायकलवर बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या पोलिसांनी मला माझी पॅन्ट उतरवून डोक्यावर घालायला सांगितली. त्यानंतर मला तेलाची बाटली देऊन ती गुप्त अंगास लावून मला पट्ट्याने जबर मारहाण केली असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT