भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील पश्चिम महामार्गावर 55 कोटींच्या शासकीय निधीतून 3 भुयारी मार्ग (अंडरपास) व 1 पादचारी पुलाच्या कामाला गणेशोत्सवानंतर सुरुवात होणार आहे. यामुळे महामार्गावर रस्ता ओलांडताना होणार्या अपघातांची संख्या शून्यावर येणार असून या कामासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी संबंधित विकासकामांना मंजुरी दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
या महामार्गावरून रस्ता ओलांडताना अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यातच शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडायचा झाल्यास त्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. शाळेच्या सकाळ व दुपारच्या सत्रात महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असतात. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना महामार्गावरून रस्ता ओलांडणे धोकादायक ठरू लागले आहे. त्यातच एखाद्या वाहनाला डाव्या किंवा उजव्या बाजूला वळण घ्यायचे झाल्यास समोरून भरधाव वेगाने येणार्या वाहनांमुळे वळण घेण्यास मोठा विलंब लागतो. अशातच वळण घेतेवेळी भरधाव वेगाने येणार्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या महामार्गावर पादचारी पुलासह भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. त्यासाठी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत महामार्गावरील आवश्यक विकासकामांबाबत चर्चा केली. त्याला सहमती दर्शवित गडकरी यांनी संबंधित विकासकामांना मान्यता देत 55 कोटींच्या निधीला मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
यानुसार महामार्गावर एकूण 3 भुयारी मार्ग व 1 पादचारी मार्ग बांधण्यात येणार असून यातील भुयारी मार्ग दिल्ली दरबार हॉटलेच्या सिग्नलजवळ, वेस्टर्न हॉटेल जवळ व पांडुरंग वाडी येथे प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर पादचारी पूल चेना येथील हिल टॉप हॉटेल जवळ प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग व्हेइक्युलर अंडरपास पद्धतीने बांधण्यात येणार असून त्यातून वाहने व पादचार्यांना ये-जा करता येणार आहे. महामार्गावर दिवसागणिक वाढणार्या वाहनांची संख्या व भरधाव वेगाने धावणार्या वाहनांमुळे महामार्गावर होणारे अपघात पाहता याठिकाणी भुयारी मार्ग, पादचारी पुलांची नितांत आवश्यकता असल्याचे दिसून आल्यानेच त्यासाठी पाठपुरावा केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या प्रस्तावित विकासकामांची एनएचएआयकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ठेकेदाराची देखील नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे काम यंदाच्या गणेशोत्सवानंतर सुरु होऊन ते एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग व पादचारी पुलाच्या जागांची सरनाईक यांनी नॅशनल हायवे ऍथॉरिटीचे व्यवस्थापक सुमित कुमार यांच्यासोबत नुकतीच पाहणी करून प्रास्तावित कामाचा आढावा घेतला.