वागार शालू परिधान करून मोहक फुलांनी बहरलेल्या या पठारावरील निळसर व पिवळ्या रंगांच्या फुलांची फुललेली चादर निसर्गप्रेमींसाठी सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. pudhari news network
ठाणे

ठाणे : हिरव्यागार शालूने मांजरा पठारावर फुलले नंदनवन

पुढारी वृत्तसेवा
शहापूर (ग्रामीण) : दिलीप वरकुटे

सातारा जिल्हातील निसर्गनिर्मित फुलं पाहण्यासाठी कास पठारला पर्यटकांची गर्दी होत असते त्याच धर्तीवर ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात देखील आजोब पर्वताच्या पायथ्याशी निसर्गनिर्मित लॅव्हंडर मांजरा पठार पर्यटकांना खुणावतो आहे. हिरवागार शालू परिधान करून मोहक फुलांनी बहरलेल्या या पठारावरील निळसर व पिवळ्या रंगांच्या फुलांची फुललेली चादर निसर्गप्रेमींसाठी सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

लॅव्हंडर मांजरा पठारावरील निसर्गनिर्मित फुलं

तालुक्यातील डोळखांब नजीक असलेल्या व शहापुर शिरोशी टोकावडे या राज्यमार्गावर मांजरा गाव असून याठिकाणी वनविभागाची 150 एकर जागा आहे. पूर्वेस सह्याद्रीच्या उंचच उंच कडा, तर चहूबाजूंनी हिरवेगार निसर्गाचे विलोभनीय दृष्य असणार्या व ओसाड माळरानावर डोळ्यांचे पारणे फेडणारा हिरवागार शालूचा लॅव्हेंडर मांजरा पठार पर्यटकांनासाठी मेजवानी ठरत आहे. पिवळ्या व निळसर रंगाच्या रंगीबेरंगी फुलांनी मांजरा पठारावर नंदनवन फुलले असून मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक, येथून पर्यटक, निसर्गप्रेमी येत असतात. दरम्यान ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात येथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहावयास मिळतो आहे. याच जागेमध्ये वनविभागाने बांधलेला वनतलाव असून या ठिकाणी देखील पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असतात. या ठिकाणावरून 10 कि.मी. अंतरावर चोंढे घाटघर प्रकल्प असून येथील धबधबे, धरण, व येथील निसर्ग संपदेने नटलेला परिसरही पाहण्यासारखा असून या ठिकाणी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.

लॅव्हंडर मांजरा पठारावरील निसर्गनिर्मित फुलं

लॅव्हेंडर पहायला जायचे का?

मांजरा पठारावरील पिवळ्या, निळसर रंगांनी बहरलेला लॅव्हेंडर चे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकावर उतरावे लागते तर वाहनाने शहापुर येथून मुंबई-नाशिक महामार्गावरून शेणवा मार्गे डोळखांबच्या अगोदर उजवीकडे डोळखांब-शिरोशी रस्त्यावर हा लॅव्हंडर मांजरा पठार आहे, निसर्गप्रेमी पर्यटकांनी एक वेळ या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा हा चमत्कार नक्की पहावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT