हर्षल ललित सरोदे (छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

Thane | पंढरपूर ते घुमान (पंजाब) सायकल यात्रा; डोंबिवलीकर हर्षल सरोदे यांचे धाडस

23 दिवसांत कापले 2674 किलोमीटर अंतर

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : श्रीक्षेत्र पंढरपूर ते संत शिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी आणि त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या पंजाब राज्यातील घुमान गावापर्यंत रथ आणि सायकल यात्रा 12 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली होती. या सायकलयात्रेत डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये राहणाऱ्या 48 वर्षीय हर्षल ललित सरोदे यांनी सहभाग घेऊन 23 दिवसांत तब्बल 2 हजार 674 किलोमीटर अंतर यशस्वीरित्या पार केले. डोंबिवलीत परतल्यानंतर हर्षल यांचे रहिवाशांनी जोरदार स्वागत केले.

सायकल यात्रेसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून 100 जणांनी सुरूवात केली होती. मात्र हर्षल सरोदे यांनी सलग मदतीला असणार्‍या वाहनाची (Support Vehicle) मदत न घेता ही यात्रा पूर्ण केली. विशेष म्हणजे हर्षल यांच्या सायकलमध्ये कधी कधी तांत्रिक समस्या निर्माण होत असत. पण अनेक जण त्यांच्या मदतीला येत असत. जणू काही साक्षात पांडुरंग रूपाने प्रत्येकवेळी कुणी ना कुणी मदतीला धाऊन येत असल्याच्या भावना हर्षल सरोदे यांनी व्यक्त केल्या.

सायकलपटू हर्षल सरोदे यांनी यापूर्वीही अनेकदा लांब पल्ल्यांच्या सायकल फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. त्याबद्दल, तसेच इतर सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी अनेक पुरस्कार देखिल पटकावले आहेत. विशेष म्हणजे हर्षल सरोदे यांचा मुलगा शुभम हा दिव्यांग असून त्याला अधूनमधून फिट येत असतात. असे असतानाही काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका हुशार मुलाचे वॉटर पार्कमध्ये अपघाती निधन झाले. तरीही हर्षल यांनी धैर्य सोडले नाही. शुभमच्या उज्वल भवितव्यासाठी, तसेच तो या आजारातून बरा व्हावा, या हेतूने आपण लांब पल्ल्याची सायकलवारी केल्याचे त्या सांगतात. त्यासाठी घरी थांबलेल्या पती ललित यांनी मुलाची सेवा करून हर्षल यांना सहकार्य केले.

एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये हर्षल सरोदे यांच्या पुढाकाराने एव्हरग्रीन सायकल प्रेमी असा एक ग्रुप तयार केला आहे. स्वतःचे आरोग्य सुदृढ रहावे आणि पर्यावरणाचा समतोलपणा राखणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्या सांगतात. या ग्रुपमध्ये ज्येष्ठ महिला, घरकाम करणार्‍या महिला, लहान मुले/मुली आणि विकलांग मुलांना सायकल शिकण्याचे त्या धडे देत असतात. शिवाय हर्षल यांचा मुलगा शुभम याच्या नावाने अगरबत्ती अँड परफ्यूम दिव्यांग (मतिमंद) स्टॉल आहे. गेल्या 11 वर्षांपासून निवासी विभागामध्ये तीर्थरूप पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी मार्गावर असलेल्या कावेरी चौकात शुभमसह इतर काही दिव्यांग मुलांना सोबत घेऊन त्या स्टॉल चालवत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या हर्षल सरोदे यांचा सत्कार डोंबिवलीतील पाहिले पद्मश्री पुरस्कार विजेते गजाननराव माने यांच्या हस्ते मिलापनगरमधील वंदेमातरम उद्यान येथे करण्यात आला.

सायकलयात्रेहून परतलेल्या या धाडसी आणि सामाजिक कार्यकर्त्या हर्षल सरोदे यांचा सत्कार डोंबिवलीतील पाहिले पद्मश्री पुरस्कार विजेते गजाननराव माने यांच्या हस्ते मिलापनगरमधील वंदेमातरम उद्यानात करण्यात आला. यावेळी हर्षल सरोदे यांनी या सायकलवारीत आलेले अनुभव उपस्थितांशी संवाद साधताना कथन केले. तर माजी सैनिक तथा पद्मश्री गजाननराव माने यांनी हर्षल सरोदे यांचे कौतुक करताना भारतीय सैन्य दलातील आणि डोंबिवलीत त्यांच्या संकल्पनेतून उभारले जाणाऱ्या प्रेरणा वाॅर मेमोरिअलची माहिती दिली. मुला-मुलींना भारतीय सैन्य दलात भरती होण्यास प्रोत्साहन देणे हा मूळ उद्देश आहे. सदर मेमोरिअल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने उभे राहणार असल्याचेही पद्मश्री माने यांनी सांगितले. या प्रसंगी स्वरूपीणी महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा भट, डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे, सरोज विश्वामित्रे, राजश्री खैरे, योगिता थोटांगे, कल्पना बोंडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलापनगर रेसिडेन्सी वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा महाडिक यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT