ठाणे - पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आले  
ठाणे

Maharashtra Legislative Council | ठाण्यात शिवसेनेच्या विजयाचे ‘फाटक’ उघडले : उपमुख्यमंत्री शिंदे 

ठाणे - पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध, महायुती सर्वच्या सर्व 17 जागा जिंकण्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा विधान परिषेदेचे उमेदवारी अर्ज दाखल करतानाच सांगितले होते की महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार. त्याची नांदी शिवसेना दोन, भाजप दोन आणि राष्ट्रवादी दोन अशा सहा जागा बिनविरोध जिंकून झाली आहे. रवींद्र फाटक यांच्या रूपाने ठाण्यात विजयाचे फाटक उघडले असून जळगाव आणि नाशिक ही जवळपास बिनविरोध होऊ शकतात, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले.   

ठाणे - पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली आणि त्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रदान केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांनी आनंदाश्रमात गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात  विजयाचे फाटक उघडले असून यापूर्वीही ठाणे महापालिका निवडणुकीत फाटक यांची पत्नी जयश्री फाटक ह्या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत, हा योगायोग असल्याचे  म्हटले आहे. बिनविरोध निवडून देण्याची ठाण्याची संस्कृती असून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांनाही देखील आम्ही बिनविरोध निवडून दिले होते. ती परंपरा फाटक यांच्या रूपाने कायम ठेवल्याबद्दल सर्व मतदार आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांचे  शिंदे यांनी धन्यवाद व्यक्त केले.  

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असून कुणाचा कुणाला पायपोस नसल्याचे सांगत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या धुसपूसवर प्रहार केला.  २०२२ मध्ये  महायुतीचे सरकार आल्यापासून विकासाची पायाभरणी, घोडदौड असून डबल इंजिन सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठबळ  मिळत आहे. ३० जूनपर्यंत कर्ज माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु असल्याचे सांगत महाविकास आघाडीचा पाय नेहमी ब्रेकवर असायचा तर आमचा पाय हा विकासाच्या एक्सलेटरवर असल्याचे त्यांनी सांगितले.  

 मान्सूनची पूर्वतयारी झाली असून सर्व यंत्रणा सतर्क असल्याचे सांगत नामदार शिंदे यांनी  सर्व मंत्र्यांना कामे वाटून दिली असून त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान चर्चा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण होत असल्याबाबत शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले २०१४ पूर्वीचा भारत आणि आताचा विकसित भारत पहा, एवढा विकास कधीच झाला नाही. मोदीच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली, ते यशस्वी पंतप्रधान असल्याचे शिंदे यांनी म्हटले.  यावेळी नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित होते.   

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT