डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या कुप्रसिद्ध इराणी काबिल्यात बुधवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास मुंबई पोलिसांवर तुफान दगडफेक झाली. चोरीच्या गुन्ह्यात संशयित चोरट्याला उचलण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर खूँखार इराण्यांनी हिंसक हल्ला केला. काबिल्यातून ताब्यात घेतलेल्या साथीदाराला सोडविण्यासाठी केलेला दगडफेकीमध्ये एक पोलिस अधिकारी आणि 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी इराणी काबिल्यामध्ये घुसलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटनांची पुनरावृत्ती बुधवारी रात्रीच्या सुमारास झाली. मुंबई एमआयडीसी पोलिसांनी ओनू लाला इराणी (20) या संशयित चोरट्याला इराणी काबिल्यातून ताब्यात घेतले होते. ओनूला ताब्यात घेतल्याची वार्ता सर्वत्र पसरताच काबिल्यातील महिला आणि पुरूष, विशेषतः तरूण इराणी संतप्त झाले. ओनूला ताब्यात घेऊन पोलिस काही अंतरावर गेले असतानाच पाठलाग करत इराण्यांच्या हिंसक जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. अचानक दगडफेक झाल्याने पोलिसांनी थेट आंबिवली रेल्वे स्थानक गाठले. जमावाने पोलिसांचा पाठलाग करत रेल्वे स्थानकात उतरून पटरीवरील दगडांचा पोलिसांच्या दिशेने मारा केला. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली होती.
हिंसक इराण्यांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी आणि 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमी पोलिसांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही अनेकदा इराणी काबिल्यात पोलिसांवर हल्ले झाले आहेत.
कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ओनू लाला इराणी (20) याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक बुधवारी रात्री आंबिवलीतील इराणी काबिल्यात गेले होते. या पथकाने संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर ते आंबिवली रेल्वे स्थानकाकडे जात असताना इराण्यांनी त्यांंचा पाठलाग केला. बचावासाठी पथकाने गुन्हेगारासह रेल्वे स्थानकातील एका दालनाचा आधार घेतला. परंतु जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखले. या प्रकरणात एक पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संशयित गुन्हेगार ओनू इराणी याला पोलिसांनी पकडून चालविले होते. पोलिसांच्या तावडीतून ओनू याची सुटका करण्यासाठी इराणी काबिल्यामधील जमावाने पथकाच्या दिशेने दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. जमावाची दगडफेक सुरू असतानाच नातेवाईकांनी पोलिसांच्या तावडीतून सुटका केल्याने ओनू इराणी पसार झाला. पोलिसांना गंभीर दुखापती करून त्यांंना त्यांच्या कर्तव्यापासून रोखले. तसेच दगडफेकीत रेल्वेचे तिकीट घर, इतर मालमत्तेचे नुकसान केले म्हणून 20 - 25 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.