भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या आगाऊ वसुलीसाठी कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता धारकांना 21 किंवा 22 एप्रिल रोजी मालमत्ता कराची बिले ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आगाऊ कर वसुलीतून जून महिन्याच्या अखेरपर्यंत 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट कर विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. आगाऊ कर भरण्याच्या अनुषंगाने करदात्यांना मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी कर विभागाकडून कॉल सेंटर सुरू केले जाणार असल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले.
शहरात एकूण 3 लाख 63 हजार 30 मालमत्ता आहेत. त्यापैकी सुमारे 3 लाख 5 हजार निवासी तर सुमारे 58 हजार 30 व्यावसायिक मालमत्ता आहेत. पालिकेच्या मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे 300 कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे कर वसुलीचे उद्दिष्ट सुमारे 7 टक्क्यांनी वाढविल्याचे समोर आले आहे. शहरात कित्येक नवीन इमारतींची कामे सुरू असल्याच्या अनुषंगाने प्रशासनाने यंदाच्या कर वसुलीच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आल्याचे सुत्राकडून सांगण्यात आले. मात्र वाढीव कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होणार किंवा नाही हे आर्थिक वर्षाच्या शेवटी निदर्शनास येणार असले तरी कर विभागाला सक्तीने कर वसुली करून किमान सुमारे 90 टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या इतिहासात कर विभागाने प्रथमच सुमारे 86 टक्के मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली.
यंदा त्यात वाढ करण्यात आली असून यंदाच्या आर्थिक वर्षात कराच्या आगाऊ वसुलीसाठी 21 किंवा 22 एप्रिल रोजी ऑनलाईन मालमत्ता कराची बिले मालमत्ता धारकांना पाठविण्याचा निर्णय कर विभागाकडून घेण्यात आला आहे. यानंतर 25 एप्रिल रोजी मालमत्ता धारकांना प्रत्यक्षात बिले वितरीत केली जाणार आहेत.
ऑनलाईन बिले पाठविण्यासाठी एकूण मालमत्ताधारकांपैकी सुमारे 70 टक्के मालमत्ताधारकांचे मोबाईल क्रमांक कर विभागाकडून प्राप्त करण्यात आले आहेत. आगाऊ कर भरणार्यांना बिले पाठविल्यापासून ते 30 जून पर्यंत 5 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तद्नंतर 1 ते 31 जुलै दरम्यान कर भरणार्यांना 3 टक्के कर सवलत दिली जाणार आहे. ही कर सवलत शासकीय करांखेरीज पालिकेच्या कर योग्य मुल्यासह उपकरांवर देण्यात येणार आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांना कर विभागाकडून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला जाणार असून त्यांना कर भरण्यासाठी मेसेज देखील पाठविला जाणार आहे. यासाठी कर विभागाकडून कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची जास्तीत जास्त आगाऊ कर वसुली करण्यासाठी कर विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या दोन महिन्यांत आगाऊ कराची वसुली 100 कोटींहून अधिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच मालमत्ताधारकांना आगाऊ कर भरण्यासाठी कॉल सेंटर सुरू करून त्याद्वारे संपर्क साधला जाणार आहे.चंद्रकांत बोरसे, सहाय्यक आयुक्त (कर विभाग)