ठाणे : वन जमिनीवरील जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीनंतर संतोष पवार नामक इसमाने विरोधी दोघांच्या अंगावर गाडी घालून विठ्ठल गायकर या तरुणाला त्या गाडीखाली चिरडले. या घटनेत विठ्ठल या तरुणाचा मृत्यू झाला असून तक्रारदार शंकर वरठे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर गुन्हा दाखल होताच एकाला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, मयत हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेना गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) रात्री वागळे इस्टेट रोड नंबर २७ येथे घडली आहे.
वागळे इस्टेट, रोड नं २८ जुना गाव येथील तक्रारदार शंकर वरठे (४९), त्यांचा मामा भाऊ बाबू बरफ आणि मित्र वसंत टोकरे तसेच मयत विठ्ठल गायकर असे चौघे जण २ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रोड नंबर २७ येथील हॅप्पी मॅन पुतळ्याचे समोर चहा पिण्यासाठी आले होते. याचदरम्यान त्याच परिसरात राहणारे संतोष पवार, महेश पवार, अमित पवार आणि महेश पाटील हे चौघे आले.
त्या चौघांनी जुन्या भांडणाच्या वादातून वसंत आणि बाबू यांना शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली. यावेळी गाडीत बसलेल्या संतोष याने रागामध्ये जोरात गाडी चालवून समोर उभा असलेल्या मयत विठ्ठल गायकर यास जोरात धडक देऊन खाली पाडले. तसेच त्यांच्या अंगावरून दोन-तीन वेळेस मागेपुढे गाडी करून त्याला जीवे ठार मारले. तर, विठ्ठल गायकर याला वाचवण्यासाठी गेलेले तक्रारदार शंकर वरठे यांनाही जीवे ठार मारण्याचा उद्देशाने संतोष याने गाडी अंगावर घालत जखमी करून संतोष गाडी घेऊन पसार झाला.
गंभीर रित्या जखमी झालेल्या विठ्ठल याला उपचारार्थ रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच तक्रारदार यांच्या छातीला आणि पायाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या चौघांपैकी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.