भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील नक्षत्र या बहुमजली इमारतीतील सेप्टिक टँकची साफसफाईचे काम करण्यासाठी इमारतीतील सोसायटीने सोमवारी (दि.6) काशिमीरा नाक्यावरील चार कामगारांना आणले होते. त्या कामगारांनी सेप्टिक टँकचे झाकण उघडताच त्यातून बाहेर पडलेल्या गॅसमुळे ते दोघे कामगार त्या टँकमध्ये पडले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा अत्यवस्थ झाल्याने त्याला लगतच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
मृत कामगाराचे नाव महेंद्र पौंडकर (37) असे असून अत्यवस्थ झालेल्या कामगाराचे नाव गणेश आवटे (40) असे आहे. हे दोघेही काशिमीरा परिसरात राहणारे आहेत. शहरातील सेप्टिक टँकची साफसफाई करण्यासाठी पालिकेने मानवाचा वापर न करता पालिकेच्या इंनोव्हेशन सेल ला संपर्क साधून मशीनद्वारे सेप्टिक टँकची साफसफाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जात असतानाही भाईंदर पूर्वेकडील नक्षत्र इमारतीतील सोसायटीने सेप्टिक टँकच्या साफसाईचे काम चार नाका कामगारांना दिले.
टँकची साफसफाई करण्यासाठी त्या कामगारांपैकी महेंद्रने टँकचे झाकण उघडले असता त्यातील गॅस वेगाने बाहेर पडला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन टँकमध्ये पडला. त्याला वाचविण्यासाठी गणेश टँकमध्ये उतरला असता तो देखील बेशुद्ध होऊन तील महेंद्रचा जागीच गुदमरून मृत्यू झाला तर गणेश हा अत्यवस्थ झाल्याचे लक्षात येताच टँकबाहेर उभे असलेल्या दोन कामगारांनी त्या टँकमध्ये पडलेल्या महेंद्र व गणेशला बाहेर काढले. त्यांना स्वच्छ करून तात्काळ लगतच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यातील महेंद्रचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले तर गणेशची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात नोंदणी करण्यात आली असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पालिका कोणती कार्यवाही करणार, हे पहावे लागणार आहे.