भिवंडी : भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामातून नऊ बालकामगार मुलींची सुटका करण्यात आली आहे. या गोदामामध्ये अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याची घटना भिवंडी तालुक्यातील वेहळे गावातून उघडकीस आली असून सामाजिक संस्थांच्या सक्रियतेमुळे पोलिसांनी छापा टाकून 9 अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.
याप्रकरणी गोदाम मालक रामा राम सुतार याच्या विरोधात बालकामगार प्रतिबंध कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोढा अप्पर ठाणे बिल्डिंग टीआरएच्या फ्लॅटमधील सुतार यांचा पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी बाल कामगारांकडून काम करून घेतले जात होते. येथील गोदामामध्ये 12 ते 17 वर्षे वयोगटातील अल्पवयीन 9 जणांना इलेक्ट्रॉनिक वस्तू पॅकिंगसाठी ठेवण्यात आल्याचे छाप्या दरम्यान निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी आई फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दत्ताराम दखिनकर व अखिल भारतीय सेना यांनी भिवंडी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. यानंतर रामा सुतार यांच्या वेहळे येथील गोदाम क्र.725 मधील गाळा क्र.107 ते 110 या ठिकाणी नारपोली पोलीस, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त भिवंडी आदींच्या संयुक्त पथकाने 20 डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता घटनास्थळी छापा टाकला. या छाप्या दरम्यान सर्व मुलींची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपी मालक रामाराम सुतार याच्याविरुद्ध बालकामगार कायदा व इतर अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेदरम्यान मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आरोपींना लवकरच अटक करणार असल्याची माहिती पोलिसाकडून देण्यात आली आहे.
गोदामामधील सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन बालकांना सुरक्षित स्थळी पाठवून त्यांची योग्य काळजी आणि पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई केली जाईल, असे संबंधित प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नारपोली पोलिसांनी नागरिकांना बालमजुरीसारख्या अमानुष कृत्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस किंवा संबंधित विभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे.