ठाणे रुग्णालय प्रशासन
सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णांच्या पंखांना बळ देण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.  pudhari news network
ठाणे

Thane News | मनोरुग्णांच्या पंखांना मिळणार बळ; रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे मनोरुग्णालयातील बर्‍या होणार्‍या रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णांच्या पंखांना बळ देण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

रोटरी इंटरनॅशनल चळवळीचा एक भाग असलेल्या ‘रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार’च्या वतीने ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिला रुग्णांसाठी विनाशुल्क ‘ब्युटीपार्लर आणि मेकअप प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ सुरू करण्यात आला आहे. अशा महिला रुग्णांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे पाऊल मानल जात आहे.

उपचारानंतर महिला मनोरुग्णांना सन्मानाने जगता यायला हवे. त्यांच्यातील कौशल्यांचा विकास व्हावा आणि त्यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लाभावा, यादृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तो एकूण चार स्तरांचा (लेव्हल) आहे.

प्रत्येक स्तर दोन महिन्यांच्या कालावधीचा असेल. मनोरुग्णालयाच्या ‘क्युपेशनल थेरपी डिपार्टमेंट’ने सुरवातीला पहिल्या लेव्हलसाठी दहा महिला रुग्णांची निवड केली आहे. त्यांचे चार स्तर पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा रुग्ण महिलांची या अभ्यासक्रमासाठी निवड केली जाईल.

‘नॅक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारला सहकार्य लाभले आहे. मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या हस्ते या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला रुग्णांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसून आली. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे भाव स्पष्टपणे जाणवत होते.

रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक

उद्घाटन समारंभास उपस्थित असलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकारच्या अध्यक्षा हैमा देशपांडे म्हणाल्या मनोरुग्णाचे पुनर्वसन करण्याचे मोठे आवाहन असते. मनोरुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांचे कुटुंबीय त्यांना मनोरुग्णालयातून घरी नेण्यासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण/प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. त्यांना एकतर स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल किंवा रोजगारही मिळू शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे कौशल्य विकासामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठी मदत होईल.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, मनोरुग्णलय, ठाणे.
SCROLL FOR NEXT