अमृत मिशन -2 मार्फत 100 एमएलडी पाणी योजना केंद्र  file photo
ठाणे

Thane News | सोनाळे, टेमघर येथे उभारणार जलशुद्धीकरण प्रकल्प

दोन वर्षांत प्रकल्प पूर्णत्वास; शहराला 123 एमएलडी पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाणी पुरवठ्याची मागणी पाहता अमृत मिशन -2 मार्फत 100 एमएलडी पाणी योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी टेमघर आणि सोनाळे येथे जलशुद्धिकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

महापालिका प्रशासनानुसार भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे 12 लाखापेक्षा जास्त आहे. शहरासाठी सध्या दररोज 120 एमएलडी पाणीपुरवठा केला जात असून, त्यापैकी 73 एमएलडी पाणी स्टेम वॉटर प्राधिकरणाकडून, 42 एमएलडी मुंबई महापालिकेकडून आणि 5 एमएलडी वर्‍हाळादेवी तलावातून पुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या प्रमाणात 42 एमएलडी कमी आहे, तर जुन्या पाइपलाइनमुळे 30 टक्के पाणी गळती होते. तर पाणी टंचाईमुळे शहरवासीयांची आंदोलने सुरूच आहेत. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला आणखी 123 एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात होईल.

नव्याने शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शहरालगत दोन ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात येणार आहेत. दोन्ही प्रकल्प ‘अमृत मिशन- 2’ अंतर्गत बांधण्यात येणार असून, त्यापैकी भातसा धरणातून येणार्‍या 100 एमएलडी पाण्यावर सोनाळे गावात प्रक्रिया करण्यात येणार आहे, तर टेमघर परिसरात 53 एमएलडी क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दोन्ही प्लांट सुरू होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने ‘अमृत मिशन-2’ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत

7 डिसेंबर 2022 रोजी अतिरिक्त 100 एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी येणार्‍या 426.04 कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार महानगरपालिकेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 33.33 टक्के खर्च म्हणजे 142 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि 156.26 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. तर 127.81 कोटी रुपये भिवंडी महापालिकेने खर्च करावयाचे आहेत.

53 एमएलडी पाणी शुद्धीकरण

सहा महिन्यांच्या खटल्यानंतर 26 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. त्याद्वारे भातसा धरणातून 16 किलोमीटरची पाईपलाईन टाकून ते पाणी सोनाळे ट्रीटमेंट प्लॉटपर्यंत आणले जाणार आहे. याशिवाय स्थानिक टेमघर परिसरात 20 कोटी रुपये खर्चून दुसरा ट्रीटमेंट प्लांट बांधण्यात येणार असून याचे कंत्राटही हैदराबादच्याच कंपनीला देण्यात आले आहे. त्यांचे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. या ठिकाणी 53 एमएलडी पाणी शुद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत मिशन-2 अंतर्गत दोन्ही प्लांट बांधणार

भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटणवार यांनी सांगितले की, ‘अमृत मिशन-2’ अंतर्गत दोन्ही प्लांट बांधले जातील. लवकरच काम सुरू होईल. पाइप लाइनसाठी 17 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम 9 नोव्हेंबर 2023 रोजी हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीला 17 जानेवारी 2024 रोजी 371 कोटी 43 लाख 49 हजार 019 रुपयांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या योजनेची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT