ठाणे : ठाण्यातील धर्मादाय रुग्णालये सरकारच्या सुविधांवर डल्ला मारत सर्रासपणे उपचारांसाठी धर्मादाय रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
अनामत रक्कम घेऊनही उपचारांसाठी रुग्णांचे मात्र हाल होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. बेड असूनही बेड उपलब्ध नाहीत असे कारण देत रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात ठाण्यात उघड झाले आहेत.
निर्धन घटकातील लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळावी तसेच दुर्बल घटकातील लोकांसाठी माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळावी या अनुषंगाने धर्मादाय अधिनियम 1950ची स्थापना करण्यात आली. या अधिनिमाअंतर्गत या लोकांना सवलतीच्या दरात रुग्णसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी धर्मादाय रुग्णालयाची आहे.
मात्र, ठाण्यातील धर्मादाय रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत या घटकातील रुग्णांना उपचार नाकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या शिवाय नियम डावलत अशा रुग्णांकडून अनामत रक्कम देखील घेतली जात आहे. रुग्णांना अॅम्ब्युलन्सची सुविधा मोफत देणे बंधनकारक असतानाही ठाण्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयातील अॅब्युलन्सच्या
सेवेसाठी अवाजवी पैसे वसूल केले जात असल्याचे प्रकार मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी यापूर्वीच उघड केले आहेत. ठाण्यातील पालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण येत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. धर्मादाय रुग्णालयामार्फत गरजू रुग्णांवर उपचार वेळेत व्हावेत यासाठी प्रशासन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
यामुळे ठाण्यातील धर्मादाय रुग्णालयाचा कारभार हा निष्क्रिय पद्धतीने सुरू असून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी दिवसा किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहितीही दिली जात नाही. धर्मादाय रुग्णालय येथे निर्धन व दुर्बल गटातील लोकांसाठी असलेल्या उत्पन्नाच्या अटी संदर्भात देखील रुग्णालय परिसरामध्ये कुठेही नोंद दिसून येत नाही. याचबरोबर शासनाच्या वतीने नियमितपणे उत्पन्नाच्या विषयी काढलेल्या आदेशाचे देखील पालन धर्मादाय रुग्णालयामार्फत होत नसल्याचे दिसून येते आहे.
ठाण्यातील धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्य व्यवस्थेचा बाजार मांडला असून निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांच्या नावावर करोडो रुपये लाटले जात आहेत. यावर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली नाही, तर मनसे येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करेल.स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग मनसे
दुर्बल व निर्धन रुग्णांकडून वाटेल तसे पैसे उपचारासाठी घेतले जातात.
औषधासाठी अवाढव्य पैसे आकारले जातात व बहुतेक रुग्णालय रुग्णांना जबरदस्तीने हॉस्पिटलच्या मेडिकलमधील औषध घेण्याचे सांगितले जाते.
बहुतेक रुग्णालयांकडून अनामत रक्कम घेतली जाते.
काही रुग्णालयांच्या आवारात पार्किंगचे पैसे देखील घेतले जातात.
बेड उपलब्ध असतानाही बेड नसल्याचे कारण दिले जाते.