खानिवडे : जलवाहतूकीला चाकरमानी प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. प्रवासी वर्गाची वाढती संख्या लक्षात घेता वसई-भाईंदर रो रो सेवेच्या नव्या सहा फेर्या वाढवण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आजपासून दिवसाला 15 फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे वसई, भाईंदरमधील चाकरमानी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता 33 वाहने व 100 प्रवासी अशी आहे. लोकल गाडी मधील वाढती गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध प्रकारच्या कारणामुळे वसई भाईंदर बहुतांश प्रवासी हे रो रो सेवेने प्रवास करू लागले आहेत.
दिवसेंदिवस रोरो ने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत एकच फेरी बोट असल्याने दिवसाला ये जा करून 9 फेर्या होत होत्या. एका किनार्यावरून दुसर्या किनार्यावर बोट गेल्यानंतर जवळपास 45 मिनिटे ते 1 तास प्रवाशांना वाट बघत राहावे लागत होते. त्यामुळे अनेकदा प्रवासी आलेल्या जागेवरून पुन्हा माघारी जात होते. फेरी बोटींची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी ही प्रवाशांकडून करण्यात येत होती.
आता आणखीन एक नवीन बोट वसई भाईंदर या रोरो सेवेत दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे 26 जानेवारी पासून दैनंदिन रोरो फेर्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात नवीन 6 फेर्या वाढणार असून दिवसाला ये जा करून 15 फेर्या रोरो च्या होणार आहेत. रोरो च्या फेर्यांमध्ये वाढ झाल्याने वसई भाईंदर दोन्ही जेट्टीवरून प्रवास करणार्या प्रवाशांना ताटकळत उभे न राहता नियोजित वेळेत ही सेवा दिली जाणार आहे अशी माहिती रोरो सेवा व्यवस्थापक यांनी दिली आहे.
वसई जेट्टीवरून
सकाळी 11.15 वाजता
दुपारी 12.45, 3 वाजता
सायंकाळी 4.30, 6.00 आणि 7.30 वाजता
भाईंदर वरून
सकाळी 10.30, 12.00 वाजता
दुपारी 2.15, 3.45
संध्याकाळी 5.15, 6.45 वाजता
रोरो च्या बोटीतून थेट वाहने घेऊन प्रवास करता येत असल्याने अनेक प्रवासी हे रोरो सेवेचा वापर करीत आहेत. विशेषतः सायंकाळी वसईतून भाईंदर व भाईंदर मधून वसई असा प्रवास करणार्या वाहनधारकांची संख्या ही अधिक आहे. आता दोन्ही बाजूने फेरीबोट सुरू राहणार असल्याने प्रवाशांचा ताटकळत राहण्याचा वेळ वाचणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.