वाहतूककोंडी
वाहतूककोंडी file photo
ठाणे

Thane News | वाहतूककोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक

पुढारी वृत्तसेवा

सापाड : कल्याण शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा ताण शहरातील वाहतूककोंडीवर पडत आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दमछाक होत आहे. नित्याच्या वाहतुककोंडीचा सामना करणाऱ्या शहरवासीयांचे अतोनात हाल होत असल्याने प्रशासनाविरोधात कल्यांकरांचा आक्रोश दिवसेंदिवस उफाळून येत आहे.

कल्याण शहराची वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका दिवसेंदिवस अनेक उपाययोजना राबवत आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीपासून एकेरी वाहतूक मार्ग, वाहतुकीच्या मार्गातील बदल असो वा चौकाचौकातून वाहतूक नियंत्रण असो. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रशासन जिकरीने प्रयत्न करत आहे. मात्र कल्याण शहराला लागलेलं वाहतूककोंडीचे ग्रहण काही केल्या सुटे ना!

शहरातून अवजड वाहनांची होत असणारी वाहतूक आणि बेशिस्त चालकांमुळे वाहतूककोंडीत मोठी भर पडत असते. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीसांची मोठी दमछाक होत असते. मात्र अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याचे आवाहन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना पेलावे लागत आहे. दुर्गाडी चौक, पत्रिपुल, शहाड पूल, कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आदी महत्त्वाच्या चौकात वाहतूककोंडी पाचवीलाच पुजली आसल्याने या चार मार्गात वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर तैनात राहावे लागते. कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेमध्ये ३४ ट्रॅफिक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक आणि ३२ पोलीस कर्मचाच्यावर ४० ते ४५ हजार वाहनांची सुरक्षित वाहतुकीचे आवाहन प्रत्येक दिवशी वाहतूक पोलीस खात्याला पेलावे लागत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांच्या कामातील खारीचा वाटा उचलणारे ४० पोलीस मदतनीस (वॉर्डन्स) शहरात कार्यरत आहेत. या ३४ पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी सुट्टीवर गेले, तर काही कार्यालयीन कामात असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रत्येक्षात २० ते २५ कर्मचारीच फिल्डवर कार्यरत असतात. या अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर कल्याण शहराच्या वाहतूककोंडीचा गाडा उचलण्याचे आवाहन आसल्याने पोलीस कर्मचाऱ्यां मधील संख्यात्मक वाढ हेच शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली लावू शकते.

कल्याण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न अतिशय जटिल झाला आहे. ते सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे ३४ कर्मचारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहेत. लोकसंख्या वाढत जाते. वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी लागणारा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे. २०११ साली कल्याणात वाहतूक शाखेत ५३ कर्मचारी कार्यरत होते. मात्र २०२४ साली त्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ होणं अपेक्षित होत. मात्र ती वाढ झाली नसून आता फक्त ३४ कर्मचारी वाहतूक शाखेला कार्यरत आसल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आमची मोठी दमछाक उडत असते.
राजेश शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा कल्याण
कल्याण शहरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. वाहतूक कोंडीवर संदर्भातील लक्षवेधी मांडण्यात आली आहे. कल्याणातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सभागृहाचे लक्ष वेधले गेले. शहरातील वाहतूककोंडीमुळे उपाययोजना काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष उपाययोजना करणार आहेत.
आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम
SCROLL FOR NEXT