तिन्ही गौरवमुर्ती माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. Pudhari News Network
ठाणे

Thane News | डोंबिवलीच्या शिरपेचात तीन मानाचे तुरे

पवन भोईर यांना द्रोणाचार्य, तर राही पाखले-आदर्श भोईर शिवछत्रपती पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार पवन भोईर यांना, तर युवा क्रीडापटू राही पाखले आणि आदर्श भोईर यांना शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे हे तिन्ही गौरवमुर्ती माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. डोंबिवलीच्या शिरपेचात एक नव्हे तर तीन मानाचे तुरे खोवले गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.

क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन भोईर यांच्यासह राही नितीन पाखले आणि आदर्श भोईर यांना मंगळवारी (दि.15) रोजी जाहीर झाले आहेत.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकरांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार चव्हाण यांनी सांगितले की, हा सन्मान मिळाला याचा मला डोंबिवलीचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी यांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजातून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद असल्याची भावना आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.

डोंबिवलीकर राही पाखले आणि मूळ डोंबिवलीकर आदर्श भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच त्यांचे गुरू पवन भोईर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १८ एप्रिल रोजी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर आणि पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, या सगळ्यांचे आमदार चव्हाण यांनी अभिनंदन केले. माझे डोंबिवलीकर माझा अभिमान असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर गौरव मूर्ती तिन्ही खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT