ठाणे : चेतना करेकर
28 मार्च 2025 नेवाळपाडा तालुका मुरबाड येथील ऐतिहासिक झुंजारराव विश्राम वाडा आगीच्या भक्षस्थानी पडला आणि दीडशे वर्षांपूर्वीचा जीताजगता इतिहास पडद्याआड गेला.
साधारपणे इ.स. 1850 सुमारास सिद्धगड किल्ला तालुका मुरबाड येथून राजे पवार घराणे किल्ल्याच्या पायथ्याशी नेवाळपाडा येथे आले. तेव्हापाासून हा वाडा अनेक घटनांचा साक्षीदार होत उभा होता. ब्रिटिश राजवटीत जहागीरी वतने बरखास्त करण्यात आली आणि त्यावेळचे राजे जयराम भाऊराव झुंजारराव यांनी किल्ल्याच्या खाली नेवाळ पाडा येथे झुंझारराव विश्राम वाडा बांधला. त्यानंतर याच वाड्यातून महसूली वसूलीचे काम चालत असून ब्रिटिश सरकाराच्या राजवटीत या वाड्यातून पांडुरंग जयराम झुंझारराव उर्फ राजे पवार हे कुटुंबासह राहू लागले. त्यांच्या समवेत शंकरराव दौलत राव हे भाऊ राहत असत. जयराम यांचे पणजोबा हे मराठी राजवटीत प्रमुख पदावर होते. राजे पवार अशी त्यांची ओळख होती. वसईचा किल्ला चिमाजी अप्पाराव यांच्या सोबत युद्ध जिंकल्यानंतर बाजीराव पेशवे यांनी झुंझारराव ही पदवी या कुटुंबाला दिली. तेव्हापासून पवारांचे झुंजारराव असे नामकरण झाले.
राजे पवारांकडे 350 गावांची जहागीर आणि 5 हजारांची मनसुपदारी मिळाली होती. ब्रिटिश काळात या वाड्यावर पांडुरंग जयराम झुंजारराव राहत असत. त्या काळात झुंजारराव घराण्याकडे महसूल वसुलीचे अधिकार होते. त्याकाळात मोरारजी देसाई हे भिवंडीचे प्रांत होते. तेही या विश्राम वाड्यावर येत असतं आणि मुक्कामही करत असतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वाड्यामध्ये झुंजारराव कुटुंबातील लक्ष्मण पांडुरंग झुंजारराव, राम पांडुरंग झुंजारराव हे येथे राहत असतं. झुंजार राव कुटुंबाची मोठी जमीन या भागात होती. त्यांच्या कुटुंबातील दोन भाऊ शंकरराव आणि दौलतराव हे कल्याण येथे राहत असतं. ते झुंजार राव मार्केटचे व्यवहार पाहत असतं. सामाजिक कार्याची जोडही या कुटुंबाने कायम या काळात जोपासली होती.
झुंजारराव नगर कल्याण पश्चिम येथे लक्ष्मणराव झुंजारराव हे कल्याण येथील शेती आणि व्यवहार पहात कधी कधी नेवाळी येथील विश्राम वाड्यावर येत असत. त्यामुळे या कुटुंबाची नाळ या वाड्याशी जोडलेली होती. झुंजारराव वाड्यातील पूर्व आणि दक्षिण बाजू ही त्यांच्याकडे होती. आज श्री कृष्ण उर्फ अरुण दादा लक्ष्मणराव झुंजारराव हे आत्तापर्यत काळात या वाड्याशी त्यांचे नाते कायम टिकून होते.
या वाड्यातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्य चालत असे. येथे पक्षाची वार्षिक अधिवेशनेही होत असतं. कल्याणचे खासदार आणि विरोधीपक्षनेते कृष्णराव धुळप, आमदार दिबा पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, एन.डी. पाटील, परभणीचे आमदार शेषराव देशमुख, मराठवाड्यातील आमदार किसनराव देशमुख, मुंबईचे आमदार भाऊसाहेब राऊत हे नेते या वाड्यात मुक्कामी येत असत त्यामुळे या काळात राजकीय केंद्र म्हणून ओळख होती. मुख्यमंत्री राहिलेले पीके उर्फ बाळासाहेब सावंत , लोकसभेचे नेते रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, जगन्नाथ पाटील, आबासाहेब पटवारी वामरावं साठ्ये हे नेते आवर्जून या वाड्यात येत असतं.अनेक राजकीय नेत्यांचे पाय या वाड्याला लागत असत त्यामुळे राजकारभाराचा खरा साक्षीदार हा वाडा होता.
पांडुरंगराव झुंजारराव यांची कन्या विठाबाई हिचा विवाह पारनेर अहमदनगरचे राजे किसनराव आबासाहेब कदम-बांडे यांच्या सोबत झाला होता. त्यामुळे अनेक राजघराण्यांशी झुंजाराव उर्फ राजे पावर यांचा संबध होता. सातारचे शाहू महाराज यांची कन्या गिरिजाराजे मल्हारराजे कदम- बांडे यांचेही कौटुंबिक स्नेह झुंझारराव कुटुुंबाशी होते. त्यामुळे राजघराण्याला मोठे ऐतिहासिक महत्त्वही आहे. अशा या सर्व गोष्टींचा केंद्रबिंदु असलेला ऐतिहासिक वाडा आगीच्या भक्षस्थानी पडला आणि या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
ह्या वाड्याला आग लागली तेव्हा झुंजारराव कुटुंबाचे भाऊबंध आणि स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. पण आग तब्बल सहा तास आग पेटत राहिली 22 बंब आग विझवण्यासाठी लागले. आग विझली ती वाडा खाक झाल्यावरच सुमारे एक कोटीचे सागवानी लाकूड यात जळून खाक झाले आहे.
झुंजारराव कुटुंबापैकी अरुण दादा झुंजारराव यांचे कुटुंब कोल्हापूर येथे असल्याने त्यांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे ऐतिहासिक वाडा वाचवण्याचे प्रयत्न असफल ठरले.आणि या अशा दुर्घटनेत इतिहासाचा एक साक्षीदार इतिहासजमा झाला.