मुंबई-वडोदरा महामार्ग Pudhari News Network
ठाणे

Thane News | मुंबई-वडोदरा महामार्गाचे आदिवासींचे पैसे परस्पर लाटले

कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, लवकरच बडे मासे गळाला लागणार

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : पंकज साताळकर

बदलापूरातून जाणार्‍या मुंबई-वडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये बदलापूर ग्रामीण भागातील अनेक शेतकरी स्थानिक व आदिवासींच्या जमिनी या रस्त्यासाठी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या भूसंपादनात केंद्र सरकार व राज्य सरकारने स्थानिक बाधित शेतकर्‍यांना मोबदला म्हणून चार पट पैसे दिले. आणि याच पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार काही स्थानिकांनी करून अपहार केल्याचे प्रकरण आता समोर आलं आहे. कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केल्याची खात्रीशीर माहिती आहे.

कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे ज्या ठिकाणाहून जात आहे. त्या ठिकाणी दहिवली आणि परिसरात अनेक गोरगरीब आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्यांची फसवणूक करून कोट्यावधी रुपये काढल्याप्रकरणी कुळगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी गोविंद पाटील यांनी दिली. तसेच हा तपास प्राथमिक स्तरावर असून याबाबत अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. ज्या तक्रारदारांनी ही तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून संबंधित अधिकारी व या भागातील काही एजंट या कटात सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सखोल आणि अत्यंत शीघ्र गतीने होणे गरजेचे असून गेल्या काही वर्षात या भागात अशा प्रकारे शेतकर्‍यांची आणि आदिवासींची पिळवणूक करून कोट्यावधी रुपयांची माया जमवणार्‍यांचे मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धाबे दणाणले आहेत. उल्हासनगर उपविभाग कार्यालयातील अनेक अधिकारी तसेच अंबरनाथतहसील कार्यालयातील अनेक अधिकार्‍यांनी कागदोपत्रांच्या अफरातफर केल्याचेही या प्राथमिक तपासात समोर येत आहे.

अनेक बडे एजंट जेलमध्ये जाणार

या प्रकरणात संबंधितांची सखोल चौकशी करत असल्याची खात्रीलायक माहिती दैनिक पुढारीच्या हाती प्राप्त झाली आहे. या प्रकरणात प्रशासनातील बडे अधिकारी, बदलापूर ग्रामीण भागातील अनेक बडे एजंट या प्रकरणात खडी फोडण्यासाठी जेलमध्ये जाणार हे निश्चित आहे.

बँकेचे काही अधिकारी सहभागी

अनेकांच्या खात्यातून पैसे वळवतांना झालेल्या अफरातफरीत बँकेचेही काही अधिकारी सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार आहे. शेकडो कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्यामुळे ईडी सारख्या मोठ्या यंत्रणेची या प्रकरणात तपासासाठी इंट्री होणार का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेच्या मोबदला प्रकरणाची चौकशी सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेने करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT