स्केटिंग खेळात पारंगत असलेल्या नक्ष नरेश घुंगरी याने डोंबिवलीचा झेंडा सातासमुद्रापार नेऊन फडकवला आहे. Pudhari News Network
ठाणे

Thane News | डोंबिवलीच्या नक्षने फडकवला सातासमुद्रापार तिरंगा

इंडोनेशिया स्पर्धेत पटकावली दोन कांस्य पदके; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गरूड झेप घेणाऱ्या नक्षवर कौतुकाचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : स्केटिंग खेळात पारंगत असलेल्या नक्ष नरेश घुंगरी याने डोंबिवलीचा झेंडा सातासमुद्रापार नेऊन फडकवला आहे. चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या नक्षने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गरूड झेप घेऊन इंडोनेशियात पार पडलेल्या स्पर्धेत तिने दोन कांस्य पदके पटकावली आहेत.

क्रीडा क्षेत्रात स्केटिंग हा विषय चर्चेचा ठरला आहे. इंडिया टीमने पुरस्कृत केलेल्या इंडोनेशियातील सेमारांग येथे पार पडलेल्या चॅम्प ऑफ द चॅम्प इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत दोन वेगवेगळ्या रिले रेस या स्पर्धेमध्ये एक नव्हे तर तब्बल दोन कांस्य पदके पटकावत डोंबिवलीकर नक्षने भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.

डोंबिवलीतील सामान्य कुटुंबातला नक्ष हा अवघ्या अकरा वर्षांचा आहे. सेंट थॉमस शाळेत शिक्षण घेणाऱ्या नक्षने स्केटिंग खेळात केलेली कामगिरी गौरवास्पद अशीच आहे. नुकत्याच इंडोनेशियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने दोन कांस्यपदके पटकावली पण...या स्पर्धेत उतरण्यासाठी त्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. आई आणि वडील हे दोघेही क्रीडा क्षेत्रामध्ये असल्यामुळे लहानपणापासूनच नक्षला खेळाची आवड होती. त्यामुळे स्केटिंग या खेळात काहीतरी करून दाखवायची जिद्द बाळगून त्याने सराव सुरू केला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी फक्त इनलाईन स्केटिंगची आवश्यकता असते. आणि स्पर्धा ही इनलाईन स्केटिंग वरच होते. स्केटिंग हा खेळ थोडासा महागडा असल्यामुळे या खेळाकडे सामान्य खेळाडू सहसा वळत नाही. अशा अनेक संकटांवर मात करत नक्षने सराव सुरू ठेवला. आई-वडिलांनी प्रयत्न करून त्याला इनलाईन स्केटिंग घेऊन दिले. स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक मदत उभी केली. आलेल्या संधीचे सोने करण्याचा नक्षने निश्चय केला होता. इंडोनेशियामध्ये दोन पदकांची कमाई करून आई-वडिलांना तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना नक्षने आश्चर्याचा धक्का दिला.

डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असलेल्या सुरभी आणि नरेश घुंगरी यांच्या एन. जी. स्केटिंग अकॅडमीत धडे गिरवलेल्या नक्षने ५०० मीटर अंतराच्या झालेल्या दोन रिले रेसेसच्या दोन्ही शर्यतीत दोन कांस्य पदकांवर स्वतःचे नाव कोरले. मात्र वैयक्तिक रिंक रेस प्रकारात नक्षला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अटीतटीच्या झालेल्या या शर्यतीत नक्ष याला शेवटच्या फेरीत आपला वेग वाढवत अंतिम रेषा पार करताना सहा सेकंद कमी पडले. त्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तरीही नक्षने हार न मानता इंडिया टीमतर्फे रिले रेसमध्ये भाग घेऊन १ कांस्यपदक पटकावले आणि मिक्स टीम रिले रेसमध्ये १ कांस्यपदक मिळवत स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांसह देशाचे नाव मोठे केले.

नक्षने ५०० मीटर अंतराच्या झालेल्या दोन रिले रेसेसच्या दोन्ही शर्यतीत दोन कांस्य पदकांवर स्वतःचे नाव कोरले.

अकराव्या वर्षातच अभूतपूर्व कामगिरी

नक्षने आतापर्यंत बऱ्याच स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन विजय मिळवला आहे. तसेच वेगवेगळ्या स्केटिंगच्या दिड तास नॉन स्टॉप स्केटिंग करण्याचे रेकॉर्ड केले आहे. नक्षला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारततर्फे नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड ग्रेड-ए हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात स्केटिंगसह किक-बॉक्सिंग आणि फुटबॉलमध्ये सुद्धा नक्षला रूची आहे. नक्ष जसे स्केटिंग स्पर्धेत पदके पटवतो तसे त्याने किक-बॉक्सिंगमध्ये १, जिल्हा पातळीवर कांस्य पदक व राज्य पातळीवर सुवर्ण पदक पटकावले आहे. डोंबिवलीकर नक्ष घुंगरी याने केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT