डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सौर उर्जा क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या सेवेसाठी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने सौर उर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. कल्याण-डोंबिवलीतील 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयांसाठी एकूण 160 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे कार्यान्वित करून कल्याण-डोंबिवलीकरांना त्यांच्या सेवेसाठी नववर्षाची भेट दिली आहे.
केडीएमसीच्या मोहीली येथील जलशुध्दीकरण प्रकल्पासह कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ अशा दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 120 किलो वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारी संयंत्रे आस्थापित करण्यात आली आहेत. केडीएमसीच्या 15 इमारतींवर 0.44 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा संयत्रे आस्थापित असून प्रती वर्षी 6.34 लक्ष सौर उर्जा युनिट उत्पादन होत आहे.
कल्याण-डॉबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन 2007 पासून नविन इमारतीवर सौर उर्जा संयंत्रे उभारण्यापासून बंधनकारक केले आहे. सौर उर्जा संयंत्रे उभारल्यानंतरच विकासकांना नविन इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. सन 2007 ते 2021 या कालावधीत 1 हजार 832 इमारतींवर 1 कोटी 10 लाख 22 हजार 585 लिटर्स प्रती दिन क्षमतेच्या सौर उष्ण जल संयत्राची उभारणी विकासकांकडून करण्यात आली आहे.
सौर उष्ण जल संयत्रामुळे केडीएमसी क्षेत्रात असलेल्या इमारतींमधील गरम पाणी करण्यासाठी लागणारा विजेचा भार कमी झाला आहे. परिणामी दरवर्षी 18 कोटी पारंपारीक वीज युनिटची बचत होत आहे. सन 2021 पासून नगरविकास विभागाच्या युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली नुसार महानगरपालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर सौर उर्जा निर्मिती करणारी सौर संयंत्रे बसविणे बंधनकारक केले आहे.
सन 2021 ते डिसेंबर 2024 अखेरपर्यंत एकूण 194 नविन इमारतीवर 3.5 मेगा वॅट क्षमतेची सौर उर्जा निर्मिती करणारे सौर संयत्रे विकासकांकडून आस्थापित करुन घेण्यात आली आहेत. सौर उर्जा निर्मिती प्रकल्पातून दरवर्षी 50.40 लक्ष सौर उर्जा वीज युनिटची निर्मिती होणार आहे. या हरित उर्जा निर्मितीतून इमारतीसाठी आवश्यक लिफ्ट, वॉटर पंप, पॅसेज लाईट, आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक विजेची गरज भागणार आहे.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर दवाखान्यात सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 170 किलो वॅटचा प्रकल्प असून त्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 120 किलो वॅटच्या प्रकल्पासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कल्याणच्या अत्रे नाटयगृहात सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचा 50 किलो वॅट प्रकल्प उभारण्यात आला असून त्यासाठी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. टिटवाळ्यातील रूक्मिणी प्लाझा हॉस्पिटलमध्ये 20 किलो वॅट सौर ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात आला असून त्यासाठी 12 लाख 55 हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 21 उच्च दाब वीज जोडणी धारकांकडून 4.3 मेगा वॅट व 891 लघु दाब विज जोडणी धारकांकडून 14.01 मेगा वॅट अशी एकूण 18 मेगा वॅट क्षमतेचे सौर उर्जा निर्मिती संयंत्रे नेट मीटरींगद्वारे आस्थापित केल्याने त्यातून प्रति वर्षी 2.60 कोटी सौर उर्जा युनिट निर्मिती होणार असल्याची माहिती महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीतील शाळा, कॉलेज, रहिवासी संस्था, सरकारी कार्यालये, मॅराथॉन स्पर्धा, डोंबिवली जिमखाना उत्सव आदी सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचार्यांनी स्वतः तयार केलेल्या पथनाट्याचे एकूण 26 प्रयोग करुन सौर ऊर्जेबाबत जनजागृती केली. तसेच 14 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहात आकर्षक माहिती पत्रकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी उर्जा संवर्धन व सौर उर्जा या बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. सौर उर्जा ही हरीत उर्जा असून काळाची गरज आहे. सौर उर्जा संयंत्रे आस्थापित करणार्या नागरीकांना महापालिकेतर्फे दरवर्षी मालमत्ता करात 1 टक्का सूट देण्यात येते. मात्र त्यासाठी नागरीकांनी सौर उर्जा संयंत्रे कार्यान्वित असल्याचा दाखला दरवर्षी महापालिकेत सादर करावा लागतो, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.