महाड : महाड शहरामध्ये गुरुवारी (दि.८) रोजी दुपारी एक वाजता च्या सुमारास शहराच्या तांबट आळी परिसरात अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.
शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे. श्रेयश सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसन धारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. महाड शहरातील तांबट आळी येथील घटनेने शहरांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. श्रेयश याने स्वतःवर गोळी झाडून जीवनप्रवास थांबवला की की बंदुकीतून गोळी सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल होत पंचनामा प्रक्रिया सुरू केली होती. महाड शहरात या धक्कादायक घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
मुलाचे वडिल सुनील नगरकर यांचा सोने, चांदीचा व्यवसाय आहे. स्वसंरक्षणासाठी त्यांच्याकडे अधिकृत परवानाधारक बंदूक आहे. त्याच बंदुकीतून श्रेयशने गोळी झाडून घेतली. नक्की प्रकरण काय आहे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.