शहापूर तालुक्यातील एस.टी.आगारात नादुरुस्त गाड्यांचा भरणा असल्या कारणाने त्यांचे ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कालच शहापूर आगारातून निघालेली बस अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सापगाव पुलावर येऊन बंद पडून प्रवशांना ताटकळत उभे राहावे लागले. शहापूर तालुक्यातील रस्त्यांवर रोज एक बस तरी कुठेना कुठे तरी ब्रेक डाऊन झाल्याचे पहावयास मिळत असल्याने ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होऊन जाणीवपूर्वक खाजगी वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शनिवारी (दि.17) दुपारी शहापूर आगारातून डोळखांबकडे निघलेली बस अवघे 3 किलोमीटर अंतर कापून आल्यावर सापगाव पुलावर बंद पडली. यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तथापि बस आगारातून निघतांना ती सुस्थितीत आहे की नाही ते पाहिले जाते. मात्र तसे न बघता जशा अवस्थेत असेल तशी आणि मिळेल ती गाडी घ्यायची आणि निघायचे असा येथे पायंडा पडलेला दिसतो. अर्थातच ड्रायव्हर व कंडक्टर यांना नाईलाजास्तव या व्यवस्थेला बळी पडावे लागत असल्याचे एका बस चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले.
आपली वाटणारी एसटीची सार्वजनिक व्यवस्था सर्व सामान्य नागरिकांच्या दळणवळणाची मुख्य वाहिनी आहे. एसटी जर कोलमडली तर तिचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतील. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच एसटीला बळ देऊन ही व्यवस्था सक्षमपणे चालविण्यासाठी विशेष - प्रयत्न करायला हवेत.सदाशिव दुधाळे, ज्येष्ठ नागरिक
शहापूर आगारातून निघालेली एम एच ०४ सी ७५९६ या क्रमांकाची बस सापगाव पुलावर बंद पडली असता त्या गाडीच्या चाकाचे ८ पैकी ३ नट-बोल्ड गायब असल्याचे दिसून आले. यदाकदाचित प्रावासादरम्यान तेही नट बोल्ड पडले आणि काही दुर्दैवी घटना घडल्यास दुर्दैवाने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान एसटीचा हा निष्काळजीपणा पराकोटीचा वाढला असून प्रवाशांनी सतर्क राहून प्रवास करणे गरजेचे आहे.