डोंबिवली (ठाणे) : कल्याणातील भारतीय जनता पार्टीचा सर्वात जुना आणि कट्टर कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या दिनेश तावडे यांचे शुक्रवारी (दि.16) सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे भगवा तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
दिनेश तावडे यांनी 1974 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणाला प्रारंभ केला. कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष अशी मोठी झेप घेतली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य, नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी पदेही त्यांनी भूषवली होती. आणीबाणीच्या काळातही त्यांनी तितक्याच आत्मियतेने पक्षाचे काम केल्याची आठवण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी करून दिली. अशा जुन्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या निधनामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.